scorecardresearch

टेलीप्रॉम्टर बंद पडल्यानं गोंधळ: रोहित पवारांनी घेतली मोदींची बाजू; म्हणाले, “…त्यामुळं या गोष्टीची चेष्टा करणं योग्य नाही”

मोदींच्या भाषणाचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल केलंय. या प्रकरणावर आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दाव्होस अजेंड्यात दूरसंवादाद्वारे विशेष भाषण दिले. या भाषणामध्ये आर्थिक वाढ कायम राखत भारत संपूर्ण खबरदारीसह करोनाच्या आणखी एका लाटेशी लढा देत आहे, असं मोदींनी सांगितलं. मात्र, यावेळी त्यांच्या टेलीप्रॉम्टरमध्ये बिघाड झाला आणि मोदींचा गोंधळ उडाला. मोदींच्या भाषणाचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल केलंय. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

‘इकॉनॉमिक फोरम’च्या ऑनलाईन बैठकीत काल बोलत असताना टेलीप्रॉम्टर बंद पडल्याने पंतप्रधानांच्या भाषणात अडथळा आल्याचा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल होतोय. अनेकजण याबाबत खिल्ली उडवतात. पण मला वाटतं अशी खिल्ली उडवणं चुकीचं आहे. एखाद्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील व्यासपीठावर पंतप्रधान बोलत असताना ते देशाचे प्रतिनिधी म्हणून बोलत असतात. अशा वेळी टेलीप्रॉम्टरचाच आधार घ्यावा लागतो. यावेळी चुकूनही एखादा शब्द चुकीचा गेल्यास ते देशासाठी परवडणारं नसतं. त्यामुळं या गोष्टीची चेष्टा करणं योग्य नाही,” असं रोहित पवार यांनी फेसबुक पोस्ट करत म्हटलंय.

नेमकं काय घडलं?

झालं असं की, भारतीयांनी करोनाविरुद्ध लढा कसा दिला यासंदर्भात बोलताना भारतीयांची इच्छाशक्ती चांगली आहे, असं मोदी म्हणाले. मात्र त्यानंतर टेलिप्रॉम्टरमध्ये काहीतरी तांत्रिक अडचण आली आणि तो बंद झाला. यानंतर पंतप्रधान मोदी भाषण देता देता थांबले. पंतप्रधान मोदी गोंधळून आणि थोड्या संतापलेल्या हावभावासहीत स्क्रीनच्या उजवीकडे पाहू लागले. नंतर त्यांनी निराश होऊन हात वर करत अखेर कानात हेडफोन लावत आपल्या भाषणामध्ये झालेल्या गोंधळानंतर समोरच्यांना ऐकू येतंय का हे विचारु लागले. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. नेटकऱ्यांनी तर, मोदींना मोठ्या प्रमाणात ट्रोल केलंय. त्यांच्या ट्रोलिंग संदर्भात रोहित पवारांनी पोस्ट करत पंतप्रधानांची खिल्ली उडवणे योग्य नसल्याचं म्हटलंय.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rohit pawar reaction on pm modi teleprompter viral video hrc

ताज्या बातम्या