नवी दिल्ली : देशात मुसळधार पावसात तीन वेगवेगळ्या विमानतळांवर दुर्घटना घडल्या आहेत. गुरुवारी जबलपूर, शुक्रवारी दिल्ली आणि शनिवारी राजकोट विमानतळाच्या छतांचा भाग कोसळला. यापैकी दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर घडलेली दुर्घटना अधिक गंभीर होती. त्यामध्ये एका कॅब चालकाचा मृत्यू झाला आणि आठ अन्य जखमी झाले. या दुर्घटनांमुळे विमानतळ सुविधांची सुरक्षा आणि आराखडा याबाबतच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत.

जबलपूर विमानतळाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ तीन महिन्यांपूर्वी, १० मार्च रोजी केले होते. २७ जूनला झालेल्या पावसात या विमानतळाच्या छताचा भाग कोसळला आणि त्यामध्ये आयकर विभाग अधिकाऱ्याच्या वाहनाचे नुकसान झाले. दुसऱ्याच दिवशी, २८ जूनला जोरदार पावसानंतर दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल-१ येथे छताचा भाग कोसळून रमेश कुमार या कॅबचालकाचा मृत्यू झाला आणि आठजण जखमी झाले. ४ महिन्यांपूर्वीच पंतप्रधान मोदींनी या टर्मिनलच्या अद्यायावतीकरणानंतर उद्घाटन केले होते.

हेही वाचा >>> राज्यघटनेवर अढळ विश्वास! ‘मन की बात’मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून मतदारांचे कौतुक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गुजरातमधील राजकोट विमानतळाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी जुलैमध्ये केले होते. नागरी हवाई उड्डाण मंत्रालयाने माहिती दिली की, विमानतळाच्या छतावर साचणारे पाणी काढून टाकण्यासाठी दुरुस्तीचे काम सुरू असतानाच शनिवारी त्याचा काही भाग कोसळला. त्यात कोणतेही नुकसान झाले नाही. तिन्ही दुर्घटनांचे तत्कालिक कारण मुसळधार पाऊस असले तरी, विरोधक आणि तज्ज्ञांनी सुरक्षेसंबंधी शिथिल नियमन आणि काम पूर्ण करण्याची घाई याकडे अंगुलीनिर्देश केला आहे. मोदी यांनी भारतात दुबई आणि सिंगापूरच्या धर्तीवर मोठ्या संख्येने विमानतळे उभारण्याचा निर्धार केला आहे. त्यांच्या कार्यकाळात देशातील विमानतळांची जवळपास दुपटीने वाढून १४० झाली असून या दशकाच्या अखेरीस त्यांची संख्या २२० करण्याचे लक्ष्य आहे. मात्र, वेगाच्या मागे धावताना गुणवत्तेवर तडजोड करता कामा नये असे विश्लेषक अमेय जोशी यांनी ‘रॉयटर्स’ला सांगितले. तसेच सध्याच्या बांधकामांचे लेखापरीक्षण करण्यासाठी यंत्रणा असणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.