Russia Announces Cancer Vaccine : जगभरातील अनेक देश आणि मोठमोठे शास्त्रज्ञ कर्करोगावरील (कॅन्सर) लस व औषधं शोधण्यासाठी संशोधण करत आहेत. या संशोधनात रशियाला मोठं यश मिळालं आहे. रशियन फेडरल मेडिकल अँड बायोलॉजिकल एजन्सीने (एफएमबीए) कर्करोगावरील लस तयार केली असल्याचा दावा केला आहे. एफएमबीएच्या प्रमुख वेरॉनिका स्क्वार्त्सोवा म्हणाल्या, “रशियन एंटरोमिक्स कॅन्सर व्हॅक्सिन आता रुग्णांवर वापरण्यास पूर्णपणे तयार आहे. या mRNA-बेस्ड व्हॅक्सिनने सर्व प्रीक्लिनिकल चाचण्या यशस्वीपणे पार केल्या आहेत. ही पूर्णपणे सुरक्षित व प्रभावी लस आहे. कोलोरेक्टल कॅन्सर (कोलन कर्करोग) हे या लसीचे पहिले लक्ष्य असेल.”
रशियन वृत्तसंस्था टीएएसएसच्या अहवालानुसार रशियाच्या कर्करोगावरील लसीने सर्व चाचण्यांमध्ये उत्तम निकाल दिले आहेत. तसेच एफएमबीएच्या प्रमुख वेरॉनिका स्क्वार्त्सोवा यांनी ईस्टर्न इकोनॉमिक फोरममध्ये या लसीची घोषणा केली आहे.
रुग्णांवर वापरण्यासाठी लस पूर्णपणे तयार
स्क्वार्त्सोवा म्हणाल्या, “गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही कर्करोगावरील लसी तयार करण्यासाठी संशोधन करत होतो. तीन वर्षांपूर्वी आम्ही लस शोधली. त्यानंतरही आव्हानं संपली नाहीत. या तीन वर्षांमध्ये अनेक प्रीक्लिनिकल चाचण्या घेण्यात आल्या. ज्यामध्ये ही लस पूर्णपणे प्रभावी असल्याचं सिद्ध झालं असून आता ही लस रुग्णांवर वापरण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. आता आम्ही केवळ अधिकृत मान्यतेच्या प्रतीक्षेत आहोत.:
आतापर्यंतच्या प्रीक्लिनिकल चाचण्या लसीची सुरक्षितता आणि वारंवार वापर केल्यानंतरही प्रभावाची पुष्टी करतात. संशोधन व प्रीक्लिनिकल चाचण्यांवेळी या लसीमुळे ट्युमरच्या आकारात घट होणे, ट्युमरची वाढ थांबण्यासारखे निकाल समोर आले असल्याचं स्क्वार्त्सोवा यांनी सांगितलं.
लसीचे आणखी काही प्रकार विकसित केले जाणार
ही लस सर्वात आधी कोलोरेक्टल कर्करोगावर (मोठ्या आतड्यांचा कर्करोग) उपचार करण्यासाठी वापरली जाईल. तसेच या लसीचा दुसरा प्रकार देखील विकसित केला जात आहे जो गिओब्लास्टोमा (मेंदूचा कर्करोग) आणि विशिष्ट प्रकारचे मेलेनोमा, त्वचेच्या कर्करोगावर प्रभावी ठरेल, अशी माहिती स्पुतनिकने एक्सद्वारे दिली आहे.