अमेरिकेच्या लॉकहीड मार्टिन प्रमाणे रशियाच्या मिग कॉर्पोरेशननेही भारताला अत्याधुनिक मिग-३५ विमाने देण्याची तयारी दर्शवली आहे. भारताकडून फायटर विमानांचे कंत्राट मिळवण्यासाठी स्पर्धेत असलेल्या चार ते पाच परदेशी कंपन्यांमध्ये मिग कॉर्पोरेशनही आहे. रोसोबोरोनेक्सपोर्टच्या माध्यमातून मिग कॉर्पोरेशन फायटर विमान पुरवठयाचे कंत्राट मिळवण्यासाठी निविदा प्रक्रियेमध्ये सहभागी होणार आहे. मिग कॉर्पोरेशन ऑफ रशियाचे सीईओ इल्या तारासेन्को यांनी ही माहिती दिली. फायनान्शिअल एक्सप्रेसने हे वृत्त दिले आहे.
भारताच्या मेक इन इंडिया धोरणाशी सुसंगत मिग-३५ फायटर विमानांची निर्मिती करण्याची तयारी मिग कॉर्पोरेशनने दाखवली आहे. अनेक दशकाच्या सहकार्यामधून मिग विमानांसाठी आवश्यक असलेले इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही भारतात उभारले आहे. यामध्ये उत्पादन आणि विक्रीनंतर विमानाच्या देखभालीसाठी आवश्यक असलेल्या बाबींचा समावेश आहे. भारतात आम्ही सिम्युलेटर आणि सर्व्हीस सेंटरची उभारणी केली. पण त्याहीपेक्षा भारतीय हवाई दलाच्या गरजा काय आहेत ? ते आम्हाला ठाऊक आहे असे इल्या तारासेन्को म्हणाले.
मिग-३५ मध्ये हे नवीन अत्याधुनिक विमान असून त्यामध्ये सर्व प्रकारचे तंत्रज्ञान आहे. पाचव्या पिढीच्या फायटर विमानाचे तंत्रज्ञान यामध्ये आहे. विमानातील एव्हीओनिक्स म्हणजे इलेक्ट्रॉनिक सिस्टिमची परिपूर्ण निर्मिती करण्यावर आम्ही जास्तीत जास्त लक्ष दिले आहे. रेंज आणि कार्यक्षमतेच्या बाबतील मिग-३५ स्पर्धक कंपन्यांच्या विमानांच्या तुलनेत जास्त परिणामकारक ठरेल असे तारासेन्को म्हणाले.
मिग-३५ मध्ये नवीन रशियन एव्हीओनिक्सचा वापर करण्यात आला आहे. नवीन कॉकपीटसह सॉफ्टवेअर सिस्टिममध्ये सुधारणा करण्यात आली आहे. मेक इन इंडियातंर्गत तुम्ही तंत्रज्ञान हस्तांतरणाला तयार आहात का? या प्रश्नावर इल्या तारासेन्को यांनी लगेच सकारात्मक उत्तर दिले. हो, भारताच्या ज्या महत्वाकांक्षा आहेत त्याची आम्हाला कल्पना आहे. आम्ही तंत्रज्ञान हस्तांतरणासाठी तयार आहोत असे त्यांनी सांगितले.
भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात रशियन बनावटीच्या फायटर विमानांची संख्या सर्वात जास्त आहे. भारताकडे मिग-२१, मिग-२७, मिग-२९ आणि सुखोई ही रशियन विमाने आहेत. पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानी फायटर विमाने भारतात घुसली होती. त्यावेळी सुखोई आणि मिग-२१ बायसन विमानांनी पाकिस्तानचा हल्ल्याचा डाव उधळून लावला होता. अभिनंदन वर्थमान यांच्या मिग-२१ बायसन विमानाने पाकिस्तानचे अत्याधुनिक एफ-१६ फायटर विमान पाडले होते. मिग-२१ ने एफ-१६ पाडण्याची ही जगातील पहिली घटना आहे.