’पदभ्रष्ट अध्यक्ष यानुकोविच यांच्याविरोधात इंटरपोल अटक वॉरंट काढण्याच्या बेतात
रशियामध्ये पुन्हा एकदा विलीन होण्याचा ठराव जरी क्रिमियाच्या संसदेने संमत केला असला तरीही, ‘सुसंस्कृत जगतातील एकही व्यक्ती’ तो अवैध मानणार नाही, असे सांगत युक्रेनच्या काळजीवाहू पंतप्रधानांनी सदर ठराव फेटाळला. तसेच पदभ्रष्ट अध्यक्ष यानुकोविच यांच्याविरोधात अटक वॉरंट बजावण्यात यावे, अशी विनंती सरकारच्या वतीने इंटरपोलला करण्यात आली आहे. रशियाने मात्र संसदेच्या या ऐतिहासिक ठरावाचे जोरदार स्वागत केले आहे.
गेले चार महिने युक्रेन प्रश्नी उद्भवलेला तिढा सुटण्याची अजूनही चिन्हे नाहीत. शुक्रवारी, रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन आणि अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्यात दूरध्वनीद्वारे चर्चा झाली. मात्र, या प्रश्नाचे स्वरूप समजावून घेण्याचा आणि त्याकडे पहाण्याचा अमेरिकेचा दृष्टिकोन एककल्ली आणि आक्षेपार्ह असल्याचे पुतिन यांनी नमूद केले. त्यामुळे या दोन राष्ट्रप्रमुखांमध्ये या प्रश्नावरून एकमत नसल्याचेच स्पष्ट झाले. दरम्यान, अमेरिकेपाठोपाठ युरोपीय महासंघानेही या प्रश्नी रशियाविरोधात आर्थिक र्निबध लादण्याचा विचार सुरू केला आहे.
युक्रेन पॅरालिंपिक स्पर्धामध्ये सहभागी
सध्याच्या वादग्रस्त घटनांच्या आणि सोशी येथेच होणाऱ्या जी ८ राष्ट्रांच्या परिषदेत रशियावरील संभाव्य बहिष्काराच्या पाश्र्वभूमीवर, युक्रेनने मात्र सोची येथे सुरू असलेल्या पॅरालंपिक स्पर्धामध्ये भाग घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मात्र, जर एखादी गंभीर किंवा आक्षेपार्ह घटना घडली तरच आमचा संघ मागे घेतला जाईल, असे युक्रेनतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
युरोपीय महासंघाचे प्रयत्न
सुमारे ४ कोटी ६० लाख लोकसंख्या असलेल्या युक्रेनमध्ये येत्या २५ मे रोजी अध्यक्षीय निवडणुका होणार आहेत, त्यापूर्वीच त्यांना अर्थसहाय्य देता यावे, यासाठी युरोपीय महासंघाने हालचाली सुरू केल्या आहेत. त्यादृष्टीने रशियावर आर्थिक र्निबध घालण्याचा तसेच युक्रेनशी प्रथमच ऐतिहासिक व्यापारी करार करण्याचा महासंघाचा प्रयत्न आहे.
प्रश्न नेमका कसला?
अमेरिकेच्या दृष्टीने रशियाने युक्रेनवर केलेले आक्रमण हा त्या देशाच्या सार्वभौमत्त्वाचा आणि लोकशाहीचाही अवमान आहे, तर युक्रेनमधील बहुसंख्य रशियन वंशाच्या नागरिकांचे ‘आक्रमकां’पासून संरक्षण करणे हे कर्तव्य असून आपण त्यासाठी काहीही करू अशी भूमिका रशियाने घेतली. मात्र एका युक्रेनसाठी अमेरिकेने रशियाशी असलेल्या संबंधांना तिलांजली देताना विचार करावा, असे आवाहनही पुतिन यांनी केले आहे.
क्रिमिया प्रोफाइल
* युक्रेनमधील स्वायत्त प्रजासत्ताक
* १९५४ मध्ये रशियातून युक्रेनमध्ये विलीन
* रशियन वंशाच्या नागरिकांची टक्केवारी : ५८.५ टक्के
* युक्रेनियन वंशाच्या नागरिकांची टक्केवारी : २४.४ टक्के