वृत्तसंस्था, कीव्ह
युक्रेनने रविवारी दुपारी केलेल्या ड्रोन हल्ल्यात रशियाची किमान ४१ लढाऊ विमाने नष्ट झाल्याची माहिती युक्रेनच्या सुरक्षा अधिकाऱ्याने वृत्तसंस्थांना दिली. हा युक्रेनने केलेला आजवरचा सर्वांत मोठा हल्ला असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे युद्धभूमीपासून तब्बल ४ हजार किलोमीटर आतमध्ये हा मारा करण्यात आला. दुसरीकडे, रशियाने शनिवारी रात्री युक्रेनवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोनद्वारे जोरदार हल्ले केले. आज, सोमवारी इस्तंबुलमध्ये होऊ घातलेल्या वाटाघाटींपूर्वी युद्धाची तीव्रता वाढल्याचे चित्र आहे.

युक्रेनच्या अधिकाऱ्याने गोपनीयतेच्या अटीवर सांगितले की, गेले एक ते दीड वर्षे या हल्ल्याची योजना आखली जात होती. राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की स्वत: योजनेवर देखरेख करत होते. रशियाच्या चार हवाई तळांना लक्ष्य करण्यात आले असून अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता असलेली लढाऊ विमाने हल्ल्यात नष्ट झाल्याचे सांगितले जाते. या हल्ल्यादरम्यान, युक्रेनचे ड्रोन पहिल्यांदाच इर्कुत्स्क भागात दिसल्याचे तेथील गव्हर्नर इगोर कोब्झेव्ह यांनी सांगितले. रशियाने या हल्ल्याला दुजोरा देताना मर्मान्स्क, इर्कुत्स्क, इव्हानोव्हो, रायझान आणि आमूर या पाच प्रांतांमधील लष्करी तळांना लक्ष्य करण्यात आल्याचे सांगितले. यापैकी इव्हानोव्हो, रायझान आणि आमूर येथील हल्ले परतवतून लावण्यात आले अशी माहिती रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने दिली. तर मर्मान्स्क, इर्कुत्स्क येथे अनेक लढाऊ विमानांना आगी लागल्या, ही आग विझवण्यात आली आणि त्यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही असे त्यांनी सांगितले. तसेच काही हल्लेखोरांना ताब्यात घेण्यात आल्याचेही रशियाकडून सांगण्यात आले.

दरम्यान, रशियाने शनिवारी रात्रभरात युक्रेनवर तब्बल ४७२ ड्रोनने हल्ले केल्याची माहिती युक्रेनच्या हवाई दलाने दिली. यापैकी ३८२ ड्रोन आणि तीन क्षेपणास्त्रे पाडण्यात आली किंवा निकामी करण्यात आल्याचाही दावा युक्रेनने केला आहे. याखेरीज रशियाने लष्करी प्रशिक्षण तळावर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात युक्रेनचे १२ सैनिक ठार आणि ६०पेक्षा जास्त जखमी झाले. एकीकडे दोन्ही बाजूंनी हल्ले वाढले असताना आपण युद्धविरामाची चर्चा करण्यासाठी सोमवारी इस्तंबुलला शिष्टमंडळ पाठवत असल्याचे झेलेन्स्की यांनी रविवारी जाहीर केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

युक्रेनला गुप्तहेरांची मदत?

युक्रेनच्या रशियात असलेल्या गुप्तहेरांनी या हल्ल्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचे दिसते. हल्ल्यातील ड्रोन ट्रकमधून कंटेनरद्वारे रशियामध्ये पाठवण्यात आले. ट्रकवरील लाकडी छतांमध्ये आत्मघातकी ड्रोन लपवण्यात आले होते. हे ट्रक हवाई तळाच्या जवळ नेण्यात य्ले आणि त्यातून ड्रोन बाहेर काढून हल्ले करण्यात आल्याची माहिती युक्रेनच्या लष्करी अधिकाऱ्यांनी दिली.