Vladimir Putin on Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी रशिया आणि युक्रेन यांच्यामधील युद्ध थांबविण्यासाठी करार केला जावा, असे विधान केले होते. त्यानंतर आता रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनीही त्यासाठी अनुकूलता दाखविल्याचे दिसत आहे. शुक्रवारी (दि. २४ जानेवारी) व्लादिमीर पुतिन म्हणाले की, २०२० साली डोनाल्ड ट्रम्प यांना सत्तेपासून दूर ठेवले नसते तर युक्रेन युद्ध टाळता आले असते. माध्यमांशी बोलत असताना पुतिन यांनी ही भूमिका मांडली. ट्रम्प पुन्हा अध्यक्षपदी निवडून आले असते तर रशिया-युक्रेन संघर्ष पेटलाच नसता, असेही ते म्हणाले.

पुतिन यांनी ट्रम्प यांची स्तुतीही केली आहे. “ते एक हुशार आणि व्यावहारिक व्यक्ती आहेत.. जर २०२० साली ट्रम्प सत्तेत असते तर त्यांच्याशी चर्चा करून युद्ध समाप्त थांबवता आले असते. तसेच युक्रेन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आम्ही पूर्वीपासूनच सामंज्यसाची भूमिका घेण्यास तयार होतो. आम्ही चर्चेसाठी तयारच आहोत, हे पुन्हा एकदा सांगत आहोत”, असे पुतिन यांनी सांगितले.

दरम्यान पुतिन यांचे विधान आणि रशियाच्या परराष्ट्र खात्याची भूमिका यांच्यात मात्र विसंगती दिसत आहे. युक्रेनला पाश्चिमात्य शस्त्रसाठा पुरविल्याबद्दल रशियाच्या परराष्ट्र खात्याने युरोपमधील देशांचा निषेध नोंदविला. तसेच युक्रेनमधील सरकार अवैध असल्याचेही म्हटले. शांततेची चर्चा व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात असातना युरोप आणि युक्रेनकडून तशी हालचाल दिसत नसल्याचा आरोपही परराष्ट्र खात्याने केला.

तसेच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी मात्र युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प-पुतिन चर्चेदरम्यान युरोपियन युनियनचाही सहभाग असावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. युरोपियन संघाशिवाय शांततेची चर्चा होऊ शकत नाही. युद्ध थांबविण्यासाठी व्यापक भागीदारीची आवश्यकता असल्याचे झेलेन्स्की म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“जर मी सत्तेत असतो तर २४ तासांत रशिया-युक्रेन युद्ध थांबवले असते”, असे विधान ट्रम्प यांनी जो बायडेन राष्ट्राध्यक्ष असताना केले होते. मात्र ट्रम्प यांचा निवडणुकीत विजय झाल्यानंतरही युद्ध सुरूच होते. त्यामुळे ते रशिया आणि युक्रेन वर युद्ध थांबविण्यासाठी दबाव टाकू शकतात, असा अंदाज वर्तविण्यात येत होता. तसेच रशिया युद्ध थांबविण्याच्या चर्चेसाठी तयार नसेल तर त्यांच्यावर कठोर निर्बंध लादले जातील, असाही इशारा ट्रम्प यांनी दिला होता.