रशियाची विमान कंपनी ‘एअरोफ्लॉट’वर सोमवारी मोठा सायबर हल्ला झाला असून, शंभरहून अधिक विमाने कंपनीला रद्द करावी लागली, तर इतर काही विमाने नियोजित वेळेपेक्षा उशिरा सोडावी लागली. मंगळवारी उशिरा विमान उड्डाणांचे नियोजन पूर्ववत झाल्याची माहिती कंपनीने दिली. मात्र, या हल्ल्यानंतर परिस्थिती पूर्ण पूर्ववत येण्यास वर्षभराचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. या हल्ल्याची चौकशी उच्च स्तरावर करण्यात येत आहे.
बेलारूसशी निगडित ‘किबेरपार्तिझनी बीवाय’ आणि ‘सायलेंट क्रो’ या दोन हॅकर गटांनी सायबर हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. यापूर्वी या वर्षी जानेवारी महिन्यात याच दोन गटांनी १ लाख १ हजार लोकांची वैयक्तिक माहिती उघड केली होती. ‘एअरोफ्लॉट’चे नेटवर्क उद्ध्वस्त करून सात हजार सर्व्हरचे नुकसान केल्याचा दावा या गटांनी केला आहे. विमानप्रवासी आणि कर्मचाऱ्यांची माहिती घेऊन कंपनीच्या वरिष्ठ पातळीवरील कर्मचाऱ्यांसह इतर कर्मचाऱ्यांच्या कम्प्युटरवरही या हॅकरनी नियंत्रण मिळवल्याचा दावा करण्यात आला.
कंपनीने म्हटले आहे, ‘मॉस्कोतून जाणारी आणि येणारी ९३ टक्के उड्डाणे नियोजित वेळेनुसार होत आहेत. सकाळी दहा वाजेपर्यंत काही विमानांचे उड्डाण कंपनीने रद्द केले. त्यानंतर पुन्हा नियोजन स्थिर झाले.’ कंपनीचे दिल्लीला येणारे विमान रशियातून थोडे उशिरा सुटले. मात्र, दिल्लीत ते वेळेत पोहोचले.
रशियाच्या माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार कुठल्याही मोठ्या सायबर हल्ल्यातून सावरण्यास काही आठवडे ते सहा महिन्यापर्यंतचा काळ लागतो. पण, एअरोफ्लॉटच्या बाबतीत हा काळ वर्षभराचा लागू शकतो. कंपनीची आयटी यंत्रणा पूर्ववत होण्यास दोन महिन्यांचा कालावधी लागू शकतो.