रशियाचे प्रोग्रेस एम २७ एम हे १० टन वजनाचे मालवाहू निर्मनुष्य अवकाशयान उड्डाणानंतर भरकटल्यानंतर पृथ्वीच्या दिशेने खाली येत असले तरी त्याचा धोका पृथ्वीवरील कुठल्याही ठिकाणाला नाही. कारण हे यान खाली येताना वातावरणात घर्षण होऊन वरच जळून जाईल त्यामुळे त्याचे मोठे तुकडे पृथ्वीवर पडण्याची शक्यता नाही. येत्या एक -दोन आठवडय़ात त्याचे तुकडे जळत खाली येतील व ते पृथ्वीवर पडण्याची शक्यता फार कमी आहे, त्यापेक्षाही फार मोठय़ा तुकडय़ांपासून पृथ्वी यापूर्वी बचावलेली आहे.
२६ मेला रशियाचे अवकाशयान माणसांना घेऊन जाणार होते ते मात्र लांबणीवर पडले आहे. गेल्या काही काळात रशियाच्या बाबतीत अनेक अवकाश दुर्घटना घडल्याने त्यांच्या अवकाश कार्यक्रमावर प्रश्नचिन्ह लागले आहे. आताचे यान पृथ्वीवर कोसळणार नसले तरी यापुढे मालवाहू जहाजे पाठवतानाही योग्य तो तांत्रिक विचार करावा लागणार आहे.
आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात सध्या सहा अवकाशवीर असून त्यांना अन्नाची फार मोठी गरज नव्हती, त्यामुळे हे मालवाहू यान तेथे न गेल्याने त्यांची उपासमार होण्याची शक्यता नाही. आता १९ जूनला नवीन मालवाहू यान जाणार आहे. अवकाशवीरांचा सध्याचा अन्नसाठा सप्टेंबरमध्ये संपणार आहे.
२८ एप्रिलला सोयूझ अग्निबाणाने प्रोग्रेस एम २७ एम यानाला घेऊन उड्डाण केले पण त्यानंतर त्यात काही तांत्रिक बिघाड झाले व ते अपेक्षित कक्षेत पोहोचू शकले नाही व आपत्कालीन स्थितीतच अडकले. पण ते अग्निबाणापासून विलग झालेले होते, त्याच्याशी पृथ्वीवरून संपर्क साधण्याचे अनेक प्रयत्न करण्यात आले पण त्यात यश आले नाही. सध्या हे यान कमी उंचीच्या सुरक्षित कक्षेत असून त्यापासून दुसऱ्या उपग्रहांना धोका नाही. आयएसएस म्हणजे आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात माल पुरवल्यानंतर तेथील कचरा घेऊन ते अवकाशातच जळून जाईल अशी व्यवस्था केलेली असते. रशियाचे अभियंते यानाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत होते पण तो होऊ शकला नाही. पण हे यान पृथ्वीवर पडणार नाही हे नक्की आहे. त्यातील काही भाग पूर्ण जळणार नाही, ते मात्र खाली पडू शकतात पण ते लोकांवर किंवा लोकवस्तीच्या भागात पडण्याची शक्यता नाही. ते लोकवस्तीत पडण्याची शक्यता फार थोडी आहे. हे यान परत खाली येण्याचा मार्ग अजून निश्चित करता आलेला नाही त्यामुळे ते तुकडे नेमेके कुठे कोसळतील हे सांगता येत नाही. सप्टेंबर २०११ मध्ये नासाचा अप्पर अ‍ॅटमॉस्फिअर रीसर्च सॅटेलाईट हा उपग्रह कोसळला होता, पण तो माणसांवर कोसळण्याची शक्यता ३२०० मध्ये एक होती. अवकाशवीरांचा अन्नसाठा अजून असला तरी ड्रॅगन एक्स  हे यान आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाकडे जात असून नंतर जपानचे अवकाशयान ऑगस्टमध्ये तेथे जात आहे. अवकाशवीरांचा अन्नसाठा ५ सप्टेंबरला संपत आहे. पाणी सप्टेंबरच्या मध्यावधीपर्यंत पुरेल एवढे आहे. अन्न पाणी संपण्याचा धोका असला तरी हे अवकाशवीर त्यांना वाटेल तेव्हा परत येऊ शकतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दृष्टिक्षेपात दुर्घटना
* १९७७- कॉसमॉस ९५४ – कॅनडाच्या उपग्रहातील किरणोत्सर्गी द्रव्यांचा कचरा वातावरणात पसरण्याचा धोका.
* १९७९- स्कायलॅब – ७७ टन वजनाची ही प्रयोगशाळा हिंदूी महासागरात कोसळली होती, ती मानवी वस्तीत कोसळली असती तर त्याची कल्पनाच केलेली बरी.
* २८ जानेवारी १९८६- अमेरिकेचे चॅलेंजर यान दुर्घटनाग्रस्त, त्यात सात अवकाशवीरांचा मृत्यू झाला. ते फ्लोरिडाजवळ अ‍ॅटलांटिक महासागरात कोसळले.
* २००१- मीर अवकाश स्थानक- रशियाचे हे १५० टनांचे अवकाश स्थानक हवेतच जळाले पण त्याचे तुकडे फिजी बेटांवर पर्यटकांना सापडले, त्यांना हे अवकाश स्थानक पेटताना बघायला मिळाले होते.
* १ फेब्रुवारी २००३- कोलंबिया स्पेस शटल पेटले, कल्पना चावलासह सात जणांचा मृत्यू, अवशेष टेक्सास व लुईझियानात पडले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Russian spacecraft falling to earth poses no danger
First published on: 05-05-2015 at 12:07 IST