Russian Woman कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्यातील कुमटा तालुक्यातल्या जंगलात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रामतीर्थ पर्वताच्या तळाशी जे जंगल आहे तिथल्या एका गुहेत एक रशियन महिला पोलिसांना आढळून आली. विशेष बाब म्हणजे ही महिला गेल्या काही वर्षांपासून तिच्या मुलींसह इथेच वास्तव्य करत होती. या महिलेची चौकशी केली असता तिने पोलिसांना आपण जंगलातल्या या गुहेत दोन मुलींसह का राहात होतो? हे कारणही सांगितलं आहे.
कोण आहे ही महिला?
रशियाची नागरिक असलेली ही महिला ४० वर्षांची आहे. तिचं नाव नीना कुटीना असं आहे. तसंच तिचं इथलं नाव मोहिनी असल्याचंही तिने सांगितलं. तिच्या दोन मुली प्रेमा (वय वर्षे ६ ) आणि आमा (वय वर्षे ४) यादेखील तिच्यासह वास्तव्य करत होत्या. २०१७ मध्ये नीना गोव्याला आली होती. तिथून ती गोकर्णला पोहचली. त्यानंतर अध्यात्मिक आयुष्याची ओढ वाटू लागल्याने तिने या जंगलात वास्तव्य करण्यास सुरुवात केली. घनदाट जंगलात नैसर्गिक रित्या तयार झालेली गुहा हेच मग नीना आणि तिच्या दोन मुलींच घर झालं आहे. तिथे तिने रुद्र मूर्ती स्थापन केली आणि ती रोज तिचा सगळा वेळ पूजा, ध्यानधारणेत घालवते आहे असंही तिने पोलिसांना सांगितलं. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.
रशियन महिलेचा शोध पोलिसांना कसा लागला?
जंगलात गस्त घालणाऱ्या काही पोलिसांना छोटी पावलं मातीत उमटलेली दिसली. त्यांचा वेध घेतला असता पोलीस निरीक्षक श्रीधर त्यांच्या टीमसह गुहेपाशी पोहचले तिथे नीना आणि तिच्या दोन मुली वास्तव्य करत असल्याचं आढळून आलं. अध्यात्मिक साधना करण्यासाठी आपण ही जागा निवडली आणि शहरी गोंगाटापासून दूर राहणं पसंत केलं असं नीनाने पोलिसांना सांगितलं. नीनाचा व्हिसा २०१७ मध्येच संपला आहे. सुरुवातीला नीनाने कुठलीही ओळख देण्यास नकार दिला. त्यानंतर महिला बालकल्याण विभागातील एका स्थानिक महिलेला बोलवण्यात आलं. योगरत्ना सरस्वती या स्थानिक साध्वी स्त्रीला नीनाने सगळी हकीकत सांगितली. माझा पासपोर्ट आणि व्हिसा हरवला आहे असं नीनाने पोलिसांना सांगितलं. मात्र पोलिसांनी शोधाशोध केली असता गुहेच्या आसपासच त्यांना नीनाचा पासपोर्ट आणि इतर महत्त्वाची कागदपत्रं मिळाली. २०१७ मध्ये तिचा व्हिसा संपला आहे. त्यामुळे नीना मागच्या आठ वर्षांपासून भारतात बेकायदेशीर रित्या राहते आहे हेच समोर आलं आहे.
नीना जंगल सोडण्यास तयार नव्हती पण…
पोलिसांनी नीनाला समजावून सांगितलं की तू जिथे राहते आहेस तो भाग भूस्खलन होणारा आणि दरड प्रवण आहे. तसंच जंगली श्वापदांची भीतीही या ठिकाणी आहे. साप, नाग, अजगर यांचाही धोका आहे. पोलिसांनी बरीच समजूत घातल्यानंतर नीनाने जंगल आणि ती गुहा सोडण्यास सहमती दर्शवली. यानंतर पोलिसांच्या सुरक्षेत तिला शंकरा प्रसाद फाऊंडेशन या एनजीओकडे सोपवण्यात आलं. १४ जुलैला या महिलेला FRRO च्या कार्यालयात हजर केलं जाईल आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन तिला तिच्या मुलींसह रशियात पाठवलं जाईल असं सांगण्यात आलं आहे. सध्या ही महिला आणि तिच्या दोन्ही मुली सुरक्षित आहेत असंही पोलिसांनी स्पष्ट केलं.