Russian Woman : कर्नाटकातील गोकर्ण येथील जंगलात नीना कुटीना (४०) नामक रशियन महिला आपल्या दोन लहान मुलींसह गुहेत राहत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी सदर महिलेला गुहेतून सुरक्षित स्थळी नेण्यात आलं. दरम्यान आता या महिलेची प्रतिक्रिया समोर आली आहे. नीनाने सांगितलं आहे की आम्ही त्या जंगलात खूप आनंदी होतो. ANI या वृत्तसंस्थेशी नीनाने संवाद साधला आहे.
काय म्हटलंय नीना कुटिनाने?
“मला आणि माझ्या मुलींना निसर्गाच्या सान्निध्यात आनंदाने राहता येत होतं. आम्ही इतक्या जवळून निसर्गाचा मुक्त आस्वाद घेत होतो. मी माझ्या मुलींना काही उपाशी पोटी मारण्यासाठी जंगलात घेऊन राहात नव्हते. मी आणि माझ्या मुली जंगलातल्या त्या गुहेत खुश होतो. ” असं नीनाने सांगितलं.
नीना म्हणाली, “आम्ही जंगलात सुखी होतो”
नीना पुढे म्हणाली, “आम्ही ज्या गुहेत वास्तव्य करत होतो ती गुहा जंगलाल्या निर्जन भागात नाही. आम्ही घनदाट जंगलात नव्हतो. आमच्या गुहेपासून एक छोटंसं गाव जवळ होतं. तसंच त्या ठिकाणी धोकादायक अशी कुठलीही बाब नव्हती. निसर्गाच्या सान्निध्यात राहणं, झऱ्याखाली अंघोळ करणं, रुचकर पदार्थ तयार करुन खाणं हे सगळं आम्ही अनुभवत होतो. माझ्या मुलीही आनंदात होत्या. मी स्वतःला किंवा माझ्या मुलींना जंगलात भुकेने तडफडून मरण्यासाठी आणलं नव्हतं.” असं नीनाने सांगितलं.
नीना कुटीनाचा व्हिसा २०१८ मध्ये संपला
नीना कुटिनाचा व्हिसा २०१८ सालीच संपला होता. ती ज्या गुहेत राहत होती, त्या परिसरात भूस्खलनाचा धोका होता. तसेच याठिकाणी जंगली श्वापदे आणि विषारी सापांचा धोकाही होता. पोलिसांनी तिची समजूत काढत तिला सुरक्षित स्थळी येण्यास राजी केले. नीना कुटिना आणि तिच्या दोन मुलींना सध्या कारवार येथील एका आश्रमात ठेवण्यात आले असून त्यांना पुन्हा रशियात पाठविण्याची प्रक्रिया सुरू आहे.
कोण आहे जंगलातल्या गुहेत सापडलेली महिला
१) नीना कुटीना असं या ४० वर्षीय महिलेचं नाव आहे. ही महिला कुमटा गोकर्णच्या तालुक्यातील जंगलात गेल्या आठ वर्षांपासून राहात होती.
२) रामतीर्थ पर्वताच्या तळाशी हे जंगल आहे. ही रशियन महिला तिच्या दोन मुलींसह राहात होती. या महिलेला दोन मुली असून त्यांची नावं प्रेमा आणि आमा अशी आहेत.
३) २०१७ मध्ये नीना गोव्याला गेली होती. तिथून गोकर्णला आणि त्यानंतर या गुहेत पोहचली. अध्यात्मिक आयुष्याची ओढ वाटू लागल्याने ती इथेच राहिली. घनदाट जंगलात नैसर्गिक रित्या तयार झालेली गुहेत ती वास्तव्य करत होती.

नीना पोलिसांना कशी सापडली?
जंगलात गस्त घालणाऱ्या काही पोलिसांना छोटी पावलं मातीत उमटलेली दिसली. त्यांचा वेध घेतला असता पोलीस निरीक्षक श्रीधर त्यांच्या टीमसह गुहेपाशी पोहचले तिथे नीना आणि तिच्या दोन मुली वास्तव्य करत असल्याचं आढळून आलं. अध्यात्मिक साधना करण्यासाठी आपण ही जागा निवडली आणि शहरी गोंगाटापासून दूर राहणं पसंत केलं असं नीनाने पोलिसांना सांगितलं. नीनाचा व्हिसा २०१७ मध्येच संपला आहे. सुरुवातीला नीनाने कुठलीही ओळख देण्यास नकार दिला. त्यानंतर महिला बालकल्याण विभागातील एका स्थानिक महिलेला बोलवण्यात आलं. योगरत्ना सरस्वती या स्थानिक साध्वी स्त्रीला नीनाने सगळी हकीकत सांगितली. माझा पासपोर्ट आणि व्हिसा हरवला आहे असं नीनाने पोलिसांना सांगितलं. मात्र पोलिसांनी शोधाशोध केली असता गुहेच्या आसपासच त्यांना नीनाचा पासपोर्ट आणि इतर महत्त्वाची कागदपत्रं मिळाली. २०१७ मध्ये तिचा व्हिसा संपला आहे.