Russian Woman : Russian Woman: कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्यातील कुमटा तालुक्यातल्या जंगलात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रामतीर्थ पर्वताच्या तळाशी जे जंगल आहे तिथल्या एका गुहेत एक रशियन महिला पोलिसांना आढळून आली. विशेष बाब म्हणजे ही महिला गेल्या आठ वर्षांपासून या जंगलात राहात होती. तिला तिथून सोडवण्यात आलं आहे.
कुमा तालुक या साध्वींच्या आश्रमात रशियन महिलेची तात्पुरती व्यवस्था
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नीना कुटीना या रशियन महिलेला जंगलातल्या गुहेतून बाहेर काढण्यात आल्यानंतर तिला कुमा तालुक यांच्या आश्रमात तात्पुरतं ठेवण्यात आलं आहे. तिला तिच्या मायदेशी पाठवण्यासाठी निधी द्यावा लागू शकतो, असं या महिलेच्या कायदेशीर सल्लागारांनी सांगितलं आहे. उत्तर कन्नड भागातील गोकर्णच्या जंगलात ही महिला तिच्या दोन मुलींसह वास्तव्य करत होती. तिचा व्हिसा आठ वर्षांपूर्वीच संपला आहे. दरड प्रवण भाग आणि हिंस्र श्वापदांची भीती असल्याने या महिलेला आणि तिच्या दोन मुलींना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे.
पोलीस अधीक्षक एम नारायणन यांनी कायं सांगितलं?
पोलीस अधीक्षक एम. नारायणन यांनी सांगितलं की आम्ही नीना आणि तिच्या दोन मुलींना रशियात पाठवण्यासाठी फॉरेनर रिजनल रजिस्ट्रेशन ऑफिसशी संपर्क केला आहे. दरम्यान कायदेशीर सल्लागारांनी हे सांगितलं आहे की तिला मायदेशी परत पाठवण्यासाठीची प्रक्रिया दीर्घ काळ सुरु राहू शकते. तसंच तिला परत पाठवण्यासाठी निधीही लागू शकतो.
कोण आहे ही रशियन महिला?
रशियाची नागरिक असलेली ही महिला ४० वर्षांची आहे. तिचं नाव नीना कुटीना असं आहे. तसंच तिचं इथलं नाव मोहिनी असल्याचंही तिने सांगितलं. तिच्या दोन मुली प्रेमा (वय वर्षे ६ ) आणि आमा (वय वर्षे ४) यादेखील तिच्यासह वास्तव्य करत होत्या. २०१७ मध्ये नीना गोव्याला आली होती. तिथून ती गोकर्णला पोहचली. त्यानंतर अध्यात्मिक आयुष्याची ओढ वाटू लागल्याने तिने या जंगलात वास्तव्य करण्यास सुरुवात केली. घनदाट जंगलात नैसर्गिक रित्या तयार झालेली गुहा हेच मग नीना आणि तिच्या दोन मुलींच घर झालं आहे. तिथे तिने रुद्र मूर्ती स्थापन केली आणि ती रोज तिचा सगळा वेळ पूजा, ध्यानधारणेत घालवते आहे असंही तिने पोलिसांना सांगितलं.
रशियन महिलेचा शोध पोलिसांना कसा लागला?
जंगलात गस्त घालणाऱ्या काही पोलिसांना छोटी पावलं मातीत उमटलेली दिसली. त्यांचा वेध घेतला असता पोलीस निरीक्षक श्रीधर त्यांच्या टीमसह गुहेपाशी पोहचले तिथे नीना आणि तिच्या दोन मुली वास्तव्य करत असल्याचं आढळून आलं. अध्यात्मिक साधना करण्यासाठी आपण ही जागा निवडली आणि शहरी गोंगाटापासून दूर राहणं पसंत केलं असं नीनाने पोलिसांना सांगितलं. नीनाचा व्हिसा २०१७ मध्येच संपला आहे. सुरुवातीला नीनाने कुठलीही ओळख देण्यास नकार दिला. त्यानंतर महिला बालकल्याण विभागातील एका स्थानिक महिलेला बोलवण्यात आलं. योगरत्ना सरस्वती या स्थानिक साध्वी स्त्रीला नीनाने सगळी हकीकत सांगितली. माझा पासपोर्ट आणि व्हिसा हरवला आहे असं नीनाने पोलिसांना सांगितलं. मात्र पोलिसांनी शोधाशोध केली असता गुहेच्या आसपासच त्यांना नीनाचा पासपोर्ट आणि इतर महत्त्वाची कागदपत्रं मिळाली. २०१७ मध्ये तिचा व्हिसा संपला आहे. त्यामुळे नीना मागच्या आठ वर्षांपासून भारतात बेकायदेशीर रित्या राहते आहे हेच समोर आलं आहे.