Russian Woman Found in Gokarna : Russian Woman Found in Cave : कर्नाटकच्या उत्तर कन्नडा जिल्ह्यात गोकर्ण जवळच्या एका दुर्गम भागात एक रशियन महिला राहत असल्याची बाब आढळून आली. विशेष म्हणजे ही महिला तिच्या दोन मुलींसह एका गुहेत राहत होती. हा प्रकार उजेडात आल्यानंतर या महिलेची सर्वत्र चर्चा होत आहे. नीना कुटीना असं या महिलेचं नाव असून आता तिला तिच्या देशात परत पाठवलं जाणार आहे. दरम्यान तिचा पार्टनर आणि तिच्या बरोबर असलेल्या दोन मुलींचा पिता ड्रोर हा भारतात आला होता. मात्र त्याला मुलींना आणि नीनाला न भेटताच परतावं लागलं. याबाबत त्याने आता त्याची व्यथा मांडली आहे.
काय म्हटलं आहे ड्रोरने?
मागच्या आठवड्यात ड्रोर गोल्डस्टेइन हा इस्रायलमधला संगीतकार भारतात आला. त्याच्या बॅगेत गरजेच्या वस्तू होत्या पण त्याही पेक्षा जास्त होती ती खेळणी आणि भेट वस्तू होत्या. या सगळ्या गोष्टी त्याने त्याच्या लहान मुलींसाठी आणल्या होत्या. प्रेमा आणि आमा या दोघींसाठी या दोघींना पाहिल्यावर ड्रोर खुश झाला होता. मात्र त्यांना भेटता आलंच नाही त्यामुळे ड्रोर त्यांना न भेटताच इस्रायलला परतला. त्यानेच ही माहिती माध्यमांना दिली. मी खूप आशेने माझ्या दोन मुलींना भेटायला आलो होतो पण कागदपत्रं आणि इतर औपचारिकतांनी इतका वेळ घेतला की मला आता इस्रायलला परतावं लागतं आहे. माझी भेट घडेल म्हणून मी FRRO च्या कार्यालयात तीन तास थांबलो होतो तरीही भेट झाली नाही असं ड्रोरने सांगितलं. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.
रामतीर्थ हिल्स या ठिकाणी जी गुहा आहे तिथे थोड्या प्रमाणात दरड कोसळली होती. तिथे कुणी अडकलं तर नाही ना? हे पाहण्यासाठी रेंजर्स आणि काही पोलीस गेले होते. त्यावेळी त्यांना तिथे नीना कुटिना आणि तिच्या दोन मुली आढळून आल्या. याबाबत ड्रोर म्हणाला, “मला माहीत नाही की नीना आणि आमच्या दोन मुली गुहेत का राहात होत्या..त्यांच्याबाबतची बातमी पाहिल्यानंतर मी तिथे गेलो होतो. पण तोपर्यंत पोलिसांनी त्यांनी गुहेच्या बाहेर काढलं होतं.”
पोलिसांना नीनाने दिलेल्या माहितीनुसार ती २०१७ पासून भारतात राहते आहे. २०१८ मध्ये ती नेपाळला जाऊन आली. त्यानंतर तिचा व्हिसा संपला तरीही ती भारतातच राहात होती. ड्रोर आणि नीना हे दोघंही २०१७ मध्येच भेटले होते. त्यानंतर ते अनेक वर्षे गोव्यात एकत्र राहिले. पण नंतर या दोघांचं नातं संपलं. त्या दोघांनी एकमेकांपासून वेगळं राहण्याचा निर्णय घेतला. पण ड्रोर त्याच्या दोन्ही मुलींना भेटायला येत होता आणि त्यांच्या संपर्कातही होता. साधारण सहा महिन्यांनी तो भारतात मुलींना भेटण्यासाठी येत होता अशी माहिती पोलिसांनी दिली. ड्रोरने माध्यमांना सांगितलं, नीनाला निसर्ग खूप आवडतो. तिचं निसर्गावर प्रचंड प्रेम आहे. त्यामुळे तिने गोकर्णच्या जंगलातील निर्जन ठिकाणी असलेली गुहा मुलींसह राहण्यासाठी निवडली. मला तिच्या निर्णयाबाबत आदर आहे मात्र मी मुलींच्या सुरक्षेबाबत थोडा काळजीत होतो असंही ड्रोर म्हणाला.
दरम्यान गोकर्ण येथील जंगलातल्या गुहेत नीना आणि तिच्या दोन मुली आढळल्यानंतर रेंजर्स आणि पोलिसांनी तिला जंगलाच्या बाहेर काढलं. याबाबतची बातमी पाहून ड्रोर तातडीने भारतात आला. त्यावेळी त्याने मुलींना भेटवस्तू आणि खेळणी आणली होती. पण वडील आणि मुलींची भेट झालीच नाही. याबाबत ड्रोर म्हणाला, “मी इस्रायलहून माझ्या मुलींना भेटायला आलो होतो. पण FRRO ने मला त्यांना भेटण्याची संमती दिलीच नाही. मी त्यांच्या केंद्राबाहेर तीन तास उभा होतो. मला आता मुलींना माझ्या घरी न्यायचं आहे.” असंही ड्रोरने सांगितलं.