Russian Woman Found in Cave : रशियन महिला नीना कुटीना ही रामतीर्थ डोंगराजवळच्या जंगलात एका गुहेत तिच्या दोन मुलींसह दोन दिवसांपूर्वी सापडली. आपण ध्यानधारणा करण्यासाठी आणि अध्यात्माचा मार्ग निवडल्याने इथे राहात होतो असं या महिलेने सांगितलं होतं. आता तिच्या बरोबर असलेल्या दोन मुलींचे वडील कोण ही माहितीही समोर आली आहे. नीना कुटीनानेच ही माहिती FRPO ला दिली. त्यांनी ही माहिती इंडियन एक्स्प्रेसला दिली आहे.
गुहेतल्या वास्तव्याबाबत नीनाने काय सांगितलं?
“मला आणि माझ्या मुलींना निसर्गाच्या सान्निध्यात आनंदाने राहता येत होतं. आम्ही इतक्या जवळून निसर्गाचा मुक्त आस्वाद घेत होतो. मी माझ्या मुलींना काही उपाशी पोटी मारण्यासाठी जंगलात घेऊन राहात नव्हते. मी आणि माझ्या मुली जंगलातल्या त्या गुहेत खुश होतो. “आम्ही ज्या गुहेत वास्तव्य करत होतो ती गुहा जंगलाल्या निर्जन भागात नाही. आम्ही घनदाट जंगलात नव्हतो. आमच्या गुहेपासून एक छोटंसं गाव जवळ होतं. तसंच त्या ठिकाणी धोकादायक अशी कुठलीही बाब नव्हती. निसर्गाच्या सान्निध्यात राहणं, झऱ्याखाली अंघोळ करणं, रुचकर पदार्थ तयार करुन खाणं हे सगळं आम्ही अनुभवत होतो. माझ्या मुलीही आनंदात होत्या. मी स्वतःला किंवा माझ्या मुलींना जंगलात भुकेने तडफडून मरण्यासाठी आणलं नव्हतं.” असं नीनाने सांगितलं. दरम्यान नीनाने दोन मुलींचे वडील कोण याबाबत माहिती दिली आहे.
नीनासह असलेल्या दोन मुलींचे वडील कोण?
फॉरेनर्स रिजनल रजिस्ट्रेशन ऑफिस अर्थात FRPO ने इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या माहितीनुसार नीना कुटीनासह सापडलेल्या दोन मुलींचे वडील म्हणजे इस्रायलचे व्यावसायिक आहेत. इस्रायलचा हा व्यावसायिक बिझनेस व्हिसा घेऊन भारतात आला होता. नीना आणि तिच्या दोन मुलींना रशियात परत पाठवण्यासाठी जो खर्च येणार आहे तो खर्च हा व्यावसायिक करु शकतो का? हे विचारण्यासाठी आम्ही त्याला संपर्क केला होता. अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार हा व्यावसायिक नीनाला काही वर्षांपूर्वी भेटला होता. दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले आणि दोघांमध्ये शरीरसंबंधही आले. ज्यानंतर नीनाला दोन मुली झाल्या. नीनाशी प्रेमसंबंध असलेला इस्रायली व्यावसायिक कापडाचा व्यावसायिक आहे.
काऊन्सिलर्सना नीनाने व्यावसायिकाबाबत सांगितलं
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नीना कुटीना सुरुवातीला या दोन मुलींचे वडील कोण? हे सांगण्यास तयार नव्हती. पण काऊन्सिलर्सशी चर्चा केल्यानंतर त्यांनी तिच्याकडून ही माहिती काढून घेतली. त्यावेळी नीनाचे या व्यावसायिकचं नाव, त्याचा पत्ता आणि संपर्कासाठीचे क्रमांक FRPO ला दिले. २०१७ किंवा २०१८ या दोन वर्षांपैकी एका वर्षी इस्रायली व्यावसायिक नीनाला भेटला होता. सुरुवातीला ते दोघंही गोव्यातल्या गुहेत राहात होते. तिथे त्यांना एक मुलगी झाली. त्यानंतर नीना गोकर्णच्या जंगलातील गुहेत राहात होती. तिथे तिला दुसरी मुलगी याच व्यावसायिकापासून झाली.

नीनाने काय म्हटलं आहे?
“मी आणि माझ्या मुली जंगलात आनंदी होतो. मला आणि माझ्या मुलींना रुग्णालयात आणण्यात आलं आहे. माझ्या दोन लहान मुलींनी पहिल्यांदा डॉक्टर पाहिला आहे. तसंच रुग्णालय पाहण्याचीही ही त्यांची पहिलीच वेळ आहे. आम्ही निसर्गाच्या सान्निध्यात राहात होतो, निसर्गाचा आस्वाद घेत होतो. आम्ही काही भुकेने तडफडून मरणार नव्हतो.” असंही नीनाने एएनआयला सांगितलं.