पीटीआय, बीजिंग
भारत आणि चीनदरम्यान द्विपक्षीय संबंध सामान्य करण्याच्या दृष्टीने दोन्ही देशांनी प्रगती करणे आवश्यक आहे असे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी सोमवारी सांगितले. मतभेदाचे रुपांतर वादात नको आणि स्पर्धेचे रुपांतर संघर्षात नको अशी भूमिका त्यांनी मांडली. ‘शांघाय सहकार्य संघटने’च्या (एससीओ) परिषदेसाठी बीजिंगला गेलेल्या जयशंकर यांनी सोमवारी चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी आणि उपाध्यक्ष हान झेंग यांची भेट घेऊन सीमेवरील सैन्याची तैनाती कमी करण्यासह महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा केली.
जयशंकर हे सिंगापूर येथून चीनमध्ये सोमवारी आले. त्यानंतर त्यांनी आधी चीनचे उपाध्यक्ष हान झेंग आणि त्यानंतर चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्या स्वतंत्र भेटी घेतल्या. ‘एससीओ’च्या अध्यक्षपदासाठी चीनच्या अध्यक्षपदाला भारताचा पाठिंबा असेल, असे जयशंकर यांनी या वेळी सांगितले.
द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी निर्बंधात्मक व्यापार उपाय टाळणे आवश्यक असल्याचे वांग यी यांच्याबरोबर झालेल्या चर्चेदरम्यान जयशंकर यांनी स्पष्ट केले. बैठकीमध्ये आपले म्हणणे मांडताना जयशंकर म्हणाले की, ‘‘मतभेदाचे रुपांतर वादात होऊ नये आणि स्पर्धेचे रुपांतर संघर्षात होऊ नये. याच आधारावर दोन्ही देशांदरम्यानच्या संबंधांमधील सकारात्मक बदल यापुढेही कायम राहू शकतात.’’ चीनने दुर्मीळ संयुगांची निर्यात थांबविली आहे, त्यासंदर्भात जयशंकर यांनी ‘‘व्यापारामध्ये अडथळा ठरतील, असे उपाय टाळण्याची गरज आहे,’’ असे मत व्यक्त केले.
पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानदरम्यान झालेल्या लष्करी संघर्षाच्या वेळी चीनने पाकिस्तानला मदत केली होती. त्याबद्दल लष्करी अधिकाऱ्यांनी इशारेही दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर सुरळीत भारत-चीन संबंधांसाठी परस्परविश्वास आवश्यक असल्याचे जयशंकर यांनी स्पष्ट केले.
सामान्य संबंध परस्परहिताचे!
वांग यी यांच्या भेटीपूर्वी जयशंकर यांनी चीनचे उपाध्यक्ष हान झेंग यांचीही भेट घेतली. ‘‘भारत-चीन संबंधांमधील तणाव सातत्याने निवळत ठेवून संबंध सामान्य ठेवले, तर ते परस्परहिताचे ठरतील आणि त्याचा दोन्ही देशांना फायदा होईल. तसेच, सध्याचे जागतिक वातावरण पाहता दोन्ही देशांतील मोकळेपणाने होणारा संवाद अतिशय महत्त्वाचा आहे,’’ अशी भूमिका जयशंकर यांनी मांडली.
तणाव निवळून परिस्थिती सामान्य करण्यासाठी सातत्याने पावले उचलली, तर दोघांना फायद्याचे ठरतील, असे परिणाम दिसतील. आजची आंतरराष्ट्रीय परिस्थिती गुंतागुंतीची आहे. शेजारी आणि मोठ्या अर्थव्यवस्थेचे देश असल्यामुळे दोघांमधील खुला, मोकळा संवाद अतिशय महत्त्वाचा आहे. – एस. जयशंकर, परराष्ट्रमंत्री