S Jaishankar on Donald Trump’ claim over War Ends : परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी बुधवारी (३० जुलै) राज्यसभेत ऑपरेशन सिंदूरवर भाषण करताना काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. स्थगित केलेल्या सिंधू जलकराराबाबत बोलताना जयशंकर म्हणाले, “काहीजण इतिहासाची पानं चाळताना घाबरतात.” तसेच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या दाव्यांवरही जयशंकर यांनी प्रतिक्रिया दिली. ट्रम्प यांनी आतापर्यंत २७ वेळा दावा केला आहे की त्यांनी भारत-पाकिस्तानमधील युद्ध थांबवलं होतं. यावरून विरोधक सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींना डिवचत आहेत. त्यावर जयशंकर यांनी आज सविस्तर टिप्पणी केली.

ट्रम्प यांचे दावे फेटाळून लावत जयशंकर म्हणाले, “मी त्या लोकांना (ट्रम्प यांच्या दाव्यांवरून मोदी सरकारवर टीका करणाऱ्यांना) सांगू इच्छितो, कान देऊन ऐका, २२ एप्रिल ते १६ जूनपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात एकही फोन कॉल झालेला नाही.”

परराष्ट्र मंत्री म्हणाले, “काही लोकांना इतिहास विसरायचा आहे. कारण त्यांना इतिहास सहन होत नाही. त्यांच्या मनाला आवडतील अशाच गोष्टी त्यांना लक्षात ठेवायच्या आहेत.”

एस. जयशंकर यांची जवाहरलाल नेहरुंवर टीका

एस. जयशंकर यांनी १९६० मध्ये भारताचे तत्कालीन पंतप्रधान दिवंगत जवाहरलाल नेहरू यांनी संसदेत केलेल्या वक्तव्याची आठवण करून दिली. ते म्हणाले, “३० नोव्हेंबर १९६० रोजी नेहरू म्हणाले होते की पाणी (सिंधू नदीचं पाणी) व पैशांच्या व्यवहाराबाबत संसदेने निर्णय घेऊ नये. त्यानंतर लोकांनी नेहरू यांच्या वक्तव्याचा निषेध केला होता. नेहरू म्हणाले होते की हा करार (सिंधू) पाकिस्तानमधील पंजाबच्या हिताचा आहे. मात्र, नेहरू यांनी हे वक्तव्य करताना किंवा करार करताना काश्मीर, पंजाब, राजस्थान व गुजरातमधील शेतकऱ्यांचा विचार केला नाही. त्यांच्याबद्दल अवाक्षर काढलं नाही. त्यावेळच्या चुकीच्या धोरणांचा परिपाक म्हणजे सिंधू जलकरार. काँग्रेसची विचारसरणी नेहमीच अशी राहिली आहे. मात्र, त्यांना अजूनही इतिहासातील चुकांमधून धडा घ्यायचा नाहीये.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नेहरुंच्या चुका मोदींनी सुधारल्या : एस. जयशंकर

परराष्ट्र मंत्री म्हणाले, “जवाहरलाल नेहरू यांनी केलेल्या चुका नरेंद्र मोदी यांनी सुधारण्याचं काम केलं. आम्हाला ६० वर्षांपासून सांगितलं जात होतं की नेहरुंच्या चुका आता सुधारता येणार नाहीत. आहे त्याच परिस्थितीत आपल्याला राहावं लागेल. परंतु, मोदी सरकारने दाखवून दिलं की इतिहासातील चुका सुधारता येतात. त्यांनी कलम ३७० हटवलं आणि आता ते सिंधू जलकरारात सुधारणा करत आहेत.”