एकीकडे जिवंतपणीच आख्यायिका बनलेला सचिन रमेश तेंडुलकर आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे रसायनशास्त्रज्ञ चिंतामणी नागेश रामचंद्र राव यांना शनिवारी केंद्र सरकारने ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर केला. सचिन क्रिकेट कारकिर्दीला निरोप देत असतानाच या किताबाची घोषणा करून सरकारने त्याच्या चाहत्यांना खूश केले. तर जगभरातील ६० विद्यापीठांच्या मानद डॉक्टरेट पदव्यांनी सन्मानित करण्यात आलेल्या ७९ वर्षीय राव यांना हा किताब देऊन सरकारने त्यांचाही गौरव केला. क्रीडा क्षेत्रातून भारतरत्न मिळालेला पहिली व्यक्ती ठरलेला सचिन हा किताब मिळवणारा सर्वात तरुण ठरला, तर  राव हे भारतरत्न मिळालेले तिसरे वैज्ञानिक आहेत.
त्यांच्यापूर्वी भौतिकशास्त्रज्ञ सी. व्ही. रमण (१९५४), अभियांत्रिकी वैज्ञानिक एम. विश्वेश्वरैय्या (१९५५) माजी राष्ट्रपती व वैज्ञानिक एपीजे अब्दुल कलाम (१९९७) आदींना हा सर्वोच्च सन्मान प्राप्त झाला आहे. प्रजासत्ताकदिनी पुरस्कार प्रदान केले जातील.
कारकिर्दीचा अखेरचा कसोटी सामना खेळत असलेल्या सचिनला भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्याची मागणी गेल्या वर्षभरापासून सुरू होती. क्रीडापटूंना भारतरत्न देता येत नाही. परंतु गेल्यावर्षी हा निकष बदलण्यात आला. तेंडुलकरला गेल्याच वर्षी राज्यसभेचे सदस्यत्वही देण्यात आले आहे. या सर्व पाश्र्वभूमीवर सचिनला शनिवारी सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर करण्यात आला. जागतिक स्तरावर प्रख्यात वैज्ञानिक अशी ओळख असलेले चिंतामणी नागेश रामचंद्र उर्फ सीएनआर राव हे ख्यातनाम रसायनशास्त्रज्ञ. मात्र, तरीही प्रसिद्धीच्या झोतापासून दूर असलेले हे व्यक्तिमत्व. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांच्या संशोधनाला मान्यता मिळाली आहे. त्यांचे १४०० शोधनिबंध व ४५ पुस्तके प्रसिद्ध आहेत. प्रा. राव यांनी केलेल्या संशोधनाला अनेक वैज्ञानिक संस्थांनी मान्यता दिलेली असून अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.
चार वर्षांनंतर पुरस्काराची घोषणा
२००९ मध्ये शास्त्रीय संगीतातील अद्वितीय गायक स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी हे या पुरस्काराने गौरविले जाणारे शेवटचे रत्न होते. त्यानंतर आजतागायत कोणालाच हा पुरस्कार देण्यात आला नव्हता. देशातील सर्वोच्च असा हा नागरी पुरस्कार ज्यांनी कोणत्याही क्षेत्रात अतुलनीय योगदान दिले आहे किंवा अत्युच्च कामगिरी केली आहे, अशा व्यक्तींच्या कर्तृत्वाची दखल घेत त्यांनाच दिला जातो. थेट पंतप्रधानांकडूनच या पुरस्काराची शिफारस राष्ट्रपतींकडे करण्यात येते. तसेच एका वर्षी हा पुरस्कार जास्तीत जास्त तीन जणांनाच देता येतो.
“विज्ञानातील माझ्या संशोधनाला व परिश्रमांना मान्यता दिल्याबद्दल मी देशाचा ऋणी आहे, यामुळे तरुणांना विज्ञानाकडे वळण्याची प्रेरणा मिळेल.’’
सी. एन. आर राव