Sadhvi Pragya Singh : मालेगाव येथे २९ सप्टेंबर २००८ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांशी संबंधित बहुप्रतिक्षित खटल्याचा राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) कायद्यांतर्गत स्थापन विशेष न्यायालय गुरूवारी निकाल दिला. हा निकाल देताना विशेष न्यायालयाचे न्यायाधीश ए. के. लाहोटी यांनी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, ले. कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह मेजर रमेश उपाध्याय (निवृत्त), अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी, सुधाकर चतुर्वेदी आणि समीर कुलकर्णी यांची पुराव्याअभावी सुटका केली. या निकालानंतर साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी नऊ महिन्यांपूर्वी केलेल्या पोस्टची चर्चा होते आहे.

न्यायालयाने निकाल देताना नेमकं काय म्हटलंय?

बॉम्बस्फोट झाला, मात्र मोटरसायकलमधे झाला हे सिद्ध करण्यात सरकारी पक्षाला अपयश आलं. आरडीएक्स प्रसाद पुरोहितने आणले हे सिद्ध होऊ शकलेले नाही. त्याच्याविरुद्धचे आरोप सिद्ध झाले नाहीत. ज्या ठिकाणी बॉम्बस्फोट झाला त्या ठिकाणाहून वैज्ञानिक पुरावे जमा केले गेले नाहीत. साध्वीच्या मोटरसायकलचा स्फोट झाल्याचा आरोप आहे. पण ही मोटरसायकल तिच्या मालकीची असल्याचे सिद्ध करण्यात अपयश आल्याचे न्यायालयाने आरोपींची सुटका करताना स्पष्ट केलं. यानंतर साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं नऊ महिन्यांपूर्वीची पोस्ट चर्चेत आली आहे.

साध्वी प्रज्ञा सिंह यांनी नऊ महिन्यांपूर्वी केलेली पोस्ट काय?

साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी त्यांच्या सूज आलेल्या चेहऱ्याचा एक फोटो पोस्ट केला आहे. त्यापुढे त्या म्हणतात “काँग्रेसचं टॉर्चर हे फक्त एटीएसच्या कोठडीपुरतं मर्यादित नाही. माझ्यासाठी या आयुष्यभराच्या मरण यातना आहेत. मेंदूला सूज, डोळ्यांनी कमी दिसणं, कमी ऐकू येणं, बोलण्यात एकसारखेपणा नसणं या सगळ्या गोष्टी मी सहन करते आहे. स्टेरॉईड आणि न्यूरो संबंधीच्या औषधांनी माझं सगळं शरीर सुजलं आहे. एका हॉस्पिटलमध्ये माझ्यावर उपचार सुरु आहेत. मी जर जगले वाचले तर न्यायालयात नक्की जाईन.” अशी पोस्ट प्रज्ञा ठाकूर यांनी लिहिली होती. तसंच त्यांनी त्यांचा चेहरा कसा सूजला होता यासंदर्भातला फोटोही पोस्ट केला होता. ही पोस्ट मालेगाव निकालानंतर चर्चेत आली आहे.

९ महिन्यांपूर्वीची पोस्ट

साध्वी प्रज्ञा आज काय म्हणाल्या?

आजच्या निकालाने गेल्या १७ वर्षांत मी पहिल्यांदा आनंदी झाले आहे. एक समाधानी संन्यासी जीवन जगत होते. पण मला, भगव्याला दहशतवादी ठरवण्यात आले. माझा अतोनात छळ करण्यात आला. मात्र आज मला आणि भगव्याला न्यायालयाने न्याय दिला आहे. मला आणि भगव्याला दहशतवादी ठरवणाऱ्यांना देश कधीच माफ करणार नाही, अशी भावना साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी निकालानंतर न्यायालयासमोर व्यक्त केली.