दिल्लीमध्ये अल्पवयीन मुलीची चाकूचे २० वार करुन हत्या करण्यात आली. या घटनेने सगळा देश हादरला. ही हत्या करणाऱ्या साहिलला पोलिसांनी बुलंदशहरमधून अटक केली आहे. मात्र ज्या दिवशी साहिलने अल्पवयीन मुलीची हत्या केली तेव्हा त्याने पार्कमध्येच मुक्काम केला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी तो बुलंदशहरला पळाला अशीही माहिती समोर आली आहे.

२८ मेच्या रात्री साहिलने १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीची हत्या केली. त्यानंतर तो तिथून पळाला. सोळा वर्षांच्या मुलीची हत्या केल्यानंतर साहिलने सर्वात आधी त्याचा मोबाईल बंद केला. तो मोबाईल त्याने गुप्ता कॉलनीजवळ असलेल्या नाल्यात फेकला. हा मोबाईल पोलिसांना मिळाला आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार साहिल सुरुवातीला रिठाला या मेट्रो स्टेशन भागात चालत गेला. तिथून त्याने समयपूर बादली या ठिकाणी जायला बस पकडली. रात्र बरीच झाली होती त्यामुळे त्या रात्री साहिल तिथल्या पार्कमध्येच झोपला. पार्कमध्ये मुक्काम केल्यानंतर सकाळी त्याने आनंद विहारला जायला बस पकडली. तिथून तो बुलंदशहरला पळाला. साहिल त्याच्या आत्याकडे गेला होता, त्याने वडिलांना फोन केल्यानंतर पोलिसांना त्याबाबत माहिती मिळाली आणि बुलंदशहरहून साहिलला अटक करण्यात आली.

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार साहिल आणि अल्पवयी मुलगी एकमेकांना एक वर्षापेक्षा जास्त काळ ओळखत होते. मागील ३ ते ४ महिन्यांपासून ते एकमेकांच्या आणखी जवळ आले होते. मात्र साहिलने त्या मुलीच्या हातावर दुसऱ्या मुलाच्या नावाचा टॅटू पाहिला आणि तो तिच्यावर चिडला. त्याने तिची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या केली. त्या मुलीची ज्या चाकूने हत्या केली तो चाकू आपण १५ दिवसांपूर्वी खरेदी केला होता असंही साहिलने चौकशीच्या दरम्यान पोलिसांना सांगितलं.

रविवारी काय घडलं?

रात्री ८ वाजता- १६ वर्षांच्या मुलीने तिच्या मित्राच्या घरी जायला निघाली होती. त्यावेळी वाटेत तिला मोहम्मद साहिल खान भेटला आणि तो तिच्याशी अरेरावीने बोलू लागला.

रात्री ८.४५ : E ब्लॉक या ठिकाणी पोहचल्यानंतर साहिलने या अल्पवयीन मुलीवर चाकूने सपासप वार केले. त्यानंतर दगडाने ठेचून तिची हत्या केली. त्यानंतर साहिल तिथून पळून गेला. त्याने त्याचा मोबाईल बंद केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये काय दिसतं आहे?

साहिल अल्पवयीन मुलीवर सातत्याने वार करु लागला. एका माणसाने त्याला अडवण्याचा प्रयत्न केला पण साहिल थांबला नाही. तो माणूस तिथून निघून गेला. अनेक लोक हे घडताना बघत होते पण कुणीही साहिलला अडवलं नाही किंवा त्या मुलीचा जीव वाचवला नाही. चाकूचे वार केल्यानंतर एक सिमेंटचा ब्लॉक त्याने उचलला आणि तिच्या डोक्यात वार केले. दगडाने तिचं डोकं ठेचलं. त्यानंतर तो तिथून पळून गेला.