देशात घडणाऱया हत्या आणि अत्याचाराच्या घटनांवर अखेर साहित्य अकादमीने आपले मौन सोडले आहे. साहित्य अकादमीने एम.एम.कलबुर्गी हत्या व वाढत्या असहिष्णूतेचा निषेध व्यक्त केला असून आज झालेल्या तातडीच्या सभेत विशेष ठराव संमत करण्यात आला आहे. कलबुर्गी हत्याप्रकरणाचा निषेध व्यक्त करत साहित्यिकांची ‘पुरस्कारवापसी’ व अकादमीच्या सदस्यांचे राजीनामा सत्र सुरू झाले. या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी आज अकादमीची तातडीची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत कलबुर्गी, पानसरे, दादरीसारख्या घटना टाळण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्याची मागणी राज्य व केंद्र सरकारकडे करण्याचा ठराव संमत करण्यात आला. तसेच ज्या साहित्यिकांनी पुरस्कार परत केले आहेत, त्यांनी ते परत स्विकारावेत असे आवाहन देखील अकादमीकडून करण्यात आले आहे. ज्या अधिकाऱयांनी निषेध म्हणून अकादमीचे काम सोडले त्यांना पुन्हा कामावर रुजू होण्याचेही आवाहन अकादमीने केले आहे.