नवी दिल्ली : दिल्लीतील १९८४ च्या शीख विरोधी दंगलीप्रकरणी आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आलेले काँग्रेस नेते सज्जनकुमार यांना प्रकृतीच्या कारणास्तव अंतरिम जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, कुमार यांनी जी वैद्यकीय कारणे दिली आहेत त्यात तथ्य नसून डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली असता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे व सुधारत चालल्याचे दिसून आले आहे.
आमदाराच्या रेल्वेतील वर्तनामुळे वादंग
पाटणा : जनता दल (यू)चा एक आमदार नवी दिल्लीला जाणाऱ्या रेल्वेगाडीतून प्रवास करीत असताना केवळ अंतर्वस्त्रांवर असल्याची ध्वनिचित्रफीत शुक्रवारी प्रसारित झाल्यानंतर विरोधकांना नितीशकुमार यांच्या सत्तारूढ पक्षावर टीका करण्याची आयती संधी मिळाली.
भागलपूर जिल्ह्यातील गोपालपूरचे आमदार गोपाल मंडल हे आदल्या दिवशी सायंकाळी तेजस एक्स्प्रेसने प्रवास करीत असतानाची ही फीत आहे. मंडल हे चड्डी-बनियानवर रेल्वे डब्यात हिंडत असल्याचा आक्षेप सहप्रवाशांनी घेतला होता. त्यावर मंडल यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांचे वय ६० वर्षे असून पोटात दुखून वारंवार शौचास जावे लागत असल्यामुळे त्यांनी केवळ चड्डी- बनियनवर शौचकूप गाठले. या वादात रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले. या आमदाराने बिहारची प्रतिमा मलिन केल्याची टीका एलजेपीचे चिराग पासवान, राजदचे प्रवक्ते आमदार भाई वीरेंद्र यांनी केली आहे.