समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांची मुलगी टीना यादव हिचा एका फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. टीना यादव लखनऊमध्ये आयोजित सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधातील आंदोलनात सहभागी झाली होती तेव्हा हा फोटो काढण्यात आल्याचा दावाही सोबत केला जात आहे. यावर समाजवादी पक्षाने स्पष्टीकरण देत, टीना यादव त्या परिसरात असताना कोणीतरी तिच्यासोबत सेल्फी काढला होता असा दावा केला आहे.

१४ वर्षीय टीना यादव रविवारी क्लॉक टॉवर येथे होती. त्या परिसरात हजारो महिला सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध करण्यासाठी आंदोलन करत होत्या. समाजवादी पक्षाने दावा केला आहे की, टीना यादव वॉकसाठी क्लॉक टॉवर येथे गेली होती. हा परिसर त्यांच्या निवासस्थानापासून जवळ आहे. यावेळी कोणीतरी तिच्यासोबत सेल्फी काढला. समाजवादी पक्षाने अखिलेश यादव यांच्या मुलीने आंदोलनात सहभाग घेतल्याचा दावा फेटाळला आहे.

अखिलेश यादव यांनी याआधी अनेकदा सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध करत आक्षेप नोंदवला आहे. त्यांनी कायद्याविरोधात सुरु असलेल्या आंदोलनांनाही पाठिंबा दर्शवला असून, आंदोलन करणारे संविधानासाठी उभे आहेत अशा शब्दांत कौतुक केलं होतं. डिसेंबर महिन्यात लखनऊमध्ये आंदोलकांना मारहाण केल्याबद्दल तसंच सार्वजनिक संपत्तीचं नुकसान झाल्याबद्दल अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेश पोलिसांवर कारवाई कऱण्याची मागणी केली होती.