पीटीआय, सीतापूर (उत्तर प्रदेश) : समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आझम खान यांची सीतापूर कारागृहातून शुक्रवारी सकाळी जामिनावर मुक्त करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी एका फसवणूकप्रकरणी त्यांना अंतरिम जामीन मंजूर केल्यानंतर त्यांची मुक्तता करण्यात आली. २७ महिन्यांनी आझम खान यांची मुक्तता झाली आहे.

आझम खान यांचे पुत्र व आमदार अब्दुल्ला आझम, प्रगतीशील समाजवादी पक्षाचे (लोहिया) नेते शिवपालसिंग यादव आणि आझम खान यांचे समर्थक त्यांच्या स्वागतासाठी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. त्यांच्यावर भूखंड बळकाववल्याच्या प्रकरणासह एकूण ८८ खटले चालू आहेत.  फसवणूकप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने त्यांना अंतरिम जामीन मंजूर केल्यानंतर आझम खान यांच्यावर सुरू असलेल्या सर्व खटल्यांत त्यांना जामीन मिळाला आहे.

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी खान यांच्या मुक्ततेचे स्वागत केले. यादव यांनी हिंदीत केलेल्या  ‘ट्विट’मध्ये म्हंटले आहे, की  या निर्णयामुळे सर्वोच्च न्यायालयाने न्यायदानाचा नवा वस्तुपाठ घालून दिला आहे. आझम खान यांची सर्व खोटय़ा खटल्यांतून  निर्दोष मुक्तता होणार आहे. कारागृहाबाहेर आझम खान यांच्यासह काढलेली छायाचित्रे शिवपाल सिंग यादव यांनी ‘ट्विटर’वर प्रसिद्ध केली आहेत.