दिल्ली विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेली असताना, आता येथील राजकीय वातावरण अधिकच तापल्याचे दिसत आहे. शिवाय, राजकीय घडामोडींनी देखील वेग घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसला आता एक मोठा झटका बसला आहे. काँग्रेसचे नेते जनार्दन द्विवेदी यांचे पुत्र समीर द्विवेदी यांनी आज काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला आहे.

विशेष बाब म्हणजे समीर यांच्या भाजपा प्रवेशाबद्दल त्यांचे वडील व काँग्रेसचे दिल्लीमधील दिग्गज नेते यांना काहीच माहिती नसल्याचे समोर आले आहे. कारण, त्यांच्या भाजपा प्रवेशानंतर जनार्दन द्विवेदी यांन आपल्याला याबाबत काहीही माहिती नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे. शिवाय, जर ते भाजपात प्रवेश करत असतील तर हा त्यांचा वैयक्तिक निर्णय असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. जनार्दन द्विवेदी हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मानले जातात. ते २०१८ पर्यंत राज्यसभेचे खासदार देखील होते.

दिल्लीत ८ फेब्रवारी रोजी मतदान होणार असून, ११ फेब्रुवारी रोजी मतमोजणी आहे. दिल्ली विधानसभेची मुदत २२ फेब्रुवारी रोजी संपणार असून, १३ फेब्रुवारीपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. दिल्लीतील २६८९ जागांवरील १३ हजार ७५० मतदान केंद्रांमध्ये मतदान होणार आहे. २०१५ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीने ७० पैकी ६७ जागा जिंकल्या होत्या. आता यंदाच्या लोकसभा निवडणुकीत दिल्लीतील सर्व सातही जागा जिंकणाऱ्या भाजापासमोर पुन्हा एकदा आम आदमी पार्टीला पराभूत करण्याचे आवाहन आहे.पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीला (आप) पाठिंबा जाहीर केला आहे.