मुंबईत १२ मार्च १९९३ रोजी झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी अभिनेता संजय दत्त याची शिक्षा सहावरून पाच वर्षे करण्याचा निर्णय दिला. चार आठवड्यांमध्ये त्याने पोलिसांना शरण यावे, असाही आदेश न्यायालयाने दिला. या प्रकरणातील प्रमुख दोषी याकूब मेमनची फाशीची शिक्षा न्यायालयाने कायम ठेवली.
शस्त्रास्त्र कायद्याखाली संजय दत्तला टाडा न्यायालयाने सहा वर्षांची शिक्षा दिली होती. त्यापैकी १८ महिन्यांची शिक्षा त्याने भोगली आहे. संजय दत्त हा एका स्वयंसेवी संघटनेचा ब्रॅंड अ‍ॅम्बेसिडर आहे. तो प्रतिष्ठित घरातून आला असून, त्याच्या कुटूंबाचा विचार करून न्यायालयाने त्याची शिक्षा माफ करावी, असा युक्तिवाद संजय दत्तच्या वकिलांनी न्यायालयात केला होता. मात्र, न्यायालयाने तो फेटाळून लावला. संजय दत्तला एक महिन्यामध्ये पुन्हा कारागृहात जावे लागणार, हे आता स्पष्ट झाले आहे. बॉम्बस्फोटातील अन्य दहा दोषींची शिक्षा फाशीवरून जन्मठेप करण्याचा निर्णय न्यायालयाने दिला. तांत्रिक कारणामुळे सादर केलेल्या सर्व याचिका न्यायालयाने फेटाळल्या. २० दोषींपैकी १७ जणांची जन्मठेपेची शिक्षा न्यायालयाने कायम ठेवली.
बॉम्बस्फोट खटल्यात टाडा न्यायालयाने १०० जणांना दोषी ठरविले होते. त्यांच्यापैकी १२ जणांना फाशी, तर अन्य २० जणांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. या सर्वानी सर्वोच्च न्यायालयात आपल्या शिक्षेला आव्हान दिले होते. खंडपीठाचे न्या. पी. सत्त्वशिवम् आणि बी.एस. चौहान यांनी याप्रकरणी निकाल दिला.
दाऊद इब्राहीम आणि टायगर मेमन अद्याप फरार
मुंबईत प्रथमच झालेल्या या बॉम्बस्फोट मालिकेत २५७ जण ठार तर ७१३ जण जखमी झाले होते. या वेळी २८ कोटी रुपयांच्या मालमत्तेची हानी झाली होती. विशेष म्हणजे या विध्वसंक कृत्यात देशात प्रथमच आरडीएक्सचा वापर करण्यात आला होता. मुंबई शेअर बाजार, एअर इंडिया इमारत, सेंच्युरी बाजार, सी रॉक, जुहू सेण्टॉर आदी महत्त्वाच्या ठिकाणी हे स्फोट घडवून आणून मुंबईकरांच्या मनात कायमची दहशत बसविण्यात आली. दाऊद इब्राहीम आणि टायगर मेमन, त्याचा भाऊ अयूब मेमन आदींनी हे कट-कारस्थान घडवून आणल्याचा आरोप असून त्यांना फरार म्हणून घोषित करण्यात आले आहे. या बॉम्बस्फोटप्रकरणी मोहम्मद इक्बाल आणि कस्टमचा माजी अधिकारी एस.एन. थापा हे दोघेही सर्वोच्च न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरू असतानाच मरण पावले. इक्बालला ‘टाडा’ न्यायालयात फाशी तर थापाला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली होती. 
‘टाडा’ न्यायालयाने ज्या २३ आरोपींना दोषमुक्त केले, त्यामध्ये मुख्य आरोपी याकूब मेमनची पत्नी रहीन मेमन, टायगर मेमनचा भाऊ सुलेमान मेमन आणि आई हनिफा मेमन यांचा समावेश आहे.