पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमेरिका दौऱ्यावरून सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप चालू आहेत. मोदींच्या अमेरिका दौऱ्यात गुगलचे सीईओ सुंदर पिचई यांनी गुजरातमध्ये ग्लोबल फिनटेक सेंटर उभारण्याची घोषणा केली. त्यावरून सध्या विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करायला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊतांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. इसापनीतीतील एका छोट्या कथेच्या माध्यमातून त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.
“आपण नक्की कोठे चाललो आहोत? असा प्रश्न तेव्हा इसापला पडला होता. तो प्रश्न मोदी काळातही कायम आहे. सध्याचा काळ हा अमृतकाळ असल्याचा ढोल वाजवला जातो, पण देश कसा बुडत आहे, देश कसा जळत आहे ते रोज दिसते”, अशा शब्दांत संजय राऊतांनी सामनामधील आपल्या रोखठोक या सदरात भूमिका मांडली आहे.
इसापची कथा…
दरम्यान, आपल्या दाव्याच्या समर्थनार्थ संजय राऊतांनी या लेखामध्ये इसापची एक कथा नमूद केली आहे. “आजची भारताची परिस्थिती अगदीच विचित्र आहे. कुणीच सांगू शकत नाही की आपण कुठे जात आहोत? इसापची एक कथा मला आठवते. इसाप हा गुलाम होता. गुलाम असल्यामुळे तो उघडपणे बोलू शकत नव्हता. एकदा इसाप गावातून खाली मान घालून जात असताना कोतवालाने त्याला हटकून विचारले, ‘तू कोठे चालला आहेस?’ इसापने उत्तर दिले, ‘मला माहीत नाही!’ त्यावर कोतवाल भडकला व इसापची गचांडी पकडून म्हणाला, ‘अच्छा, चल तुला तुरुंगात नेऊनच डांबून टाकतो!’ तुरुंगाच्या वाटेवरच इसाप कोतवालाकडे पाहत म्हणाला, ‘कोतवालसाहेब, मी कुठे जाणार ते मलाच माहीत नव्हते हे पटले ना! मी खरेच बोलत होतो ना? पण गुलामाचं कोण ऐकतंय?’ इसापच्या या बोलण्यावर कोतवाल निरुत्तर झाला”, असं राऊतांनी लेखात म्हटलं आहे.
“…तोपर्यंत बाकी लोक पसार झाले”, गुलाबराव पाटलांनी सांगितला बंडखोरीदरम्यान घडलेला किस्सा
“देशाची अशीच परिस्थिती आहे. आपण नक्की कुठे चाललो आहोत? इसापला पडलेला प्रश्न कायम आहे! सध्याचे दिल्लीचे कोतवाल याचे उत्तर देतील काय?” असा प्रश्नही संजय राऊतांनी उपस्थित केला आहे.
सदानंद रेगेंच्या कवितेचा दाखला
याशिवाय राऊतांनी कवी सदानंद रेगे यांच्या एका कवितेचाही दाखला दिला आहे. ‘यापुढे आम्हीच तुमची न्यायपत्रे लिहीत जाऊ, तुम्ही फक्त तुमचा अंगठा तेवढा मुकाट पुढे करायचा’ अशा कवितेतल्या ओळी नमूद करून संजय राऊत म्हणतात, “आजचे चित्र या कवितेपेक्षा अजिबात वेगळे नाही. न्यायपत्रे सत्ताधारी लिहितात व त्यावर फक्त मोहोर उठवली जाते. पैसा आणि सत्ता हाच काही लोकांच्या जीवनाचा केंद्रबिंदू झाला”.
“राज्यकर्ते किती बेजबाबदार आणि बेफिकीर पद्धतीने वागतात ते देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दाखवले. देशातील महागाईस सरकार जबाबदार नसून ‘निसर्ग’ जबाबदार असल्याचे बाईंनी जाहीर केले. महागाईसाठी सूर्य, चंद्र, ढग, हवा, पाणी, थंडी, बर्फ, गर्मी जबाबदार आहे. मोदीजी सोडून सगळे जबाबदार. मग ‘मोदी युगा’चा सत्तेवर बसण्याचा अर्थ तरी काय?” असा सवालही संजय राऊतांनी उपस्थित केला आहे.