नवी दिल्ली : आरोग्याच्या कारणास्तव राजीनामा देणारे माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड नेमके कुठे आहेत, याची कोणतीही माहिती मिळत नसल्याने खासदारांकडून चिंता व्यक्त होऊ लागली आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते व राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून धनखड यांचा ठावठिकाणा आणि प्रकृतीची चौकशी केली आहे.

संसदेचे पावसाळी अधिवेशन २१ जुलै रोजी सुरू झाले त्यादिवशी धनखडांची प्रकृती ठीक असल्याचे दिसत होते पण, संध्याकाळी ६ वाजता त्यांनी उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिल्याचे समजले. त्यानंतर त्यांच्याशी संपर्क झालेला नाही. ते नेमके कुठे आहेत, त्यांची प्रकृती कशी आहे, याबाबत कोणालाही काहीही माहिती नाही. काही खासदारांनी त्यांच्याशी व त्यांच्याशी निगडीत कर्मचाऱ्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न अपयशी ठरला. त्यांचा ठाकठिकाणा न समजणे ही गंभीर बाब म्हटली पाहिजे, असे राऊत यांनी पत्रात म्हटले आहे.

धनखड यांना निवासस्थानी बंदिस्त करण्यात आले असून ते सुरक्षित नसल्याच्या अफवा पसरल्या आहेत. त्यामुळे त्यांच्याविषयी देशाला माहिती मिळणे गरजेचे आहे. काही खासदारांना धनखडांची काळजी वाटत असल्याने ते सर्वोच्च न्यायालयात ‘हेबिअस-कॉर्पस रिट’ याचिका दाखल करण्याचा विचार करत आहेत, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.