महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाच्या विरोधात मांडलेला ठराव कर्नाटकच्या विधानसभेने काल एकमताने मंजूर केला. यावेळी बोलताना कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी संजय राऊतांवर जोरदार टीका केली होती. संजय राऊत देशद्रोही असून ते चीनचे एजंट असल्याचे ते म्हणाले होते. दरम्यान, बोम्मईंच्या टीकेला संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं आहे. दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

हेही वाचा – कर्नाटक विधानसभेत महाराष्ट्राविरोधात ठराव मंजूर झाल्यानंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “आपले मुख्यमंत्री कचखाऊ…”

काय म्हणाले संजय राऊत?

“चीनने भारतात खुसखोरी केली आहे. त्याचप्रमाणे कर्नाटक महाराष्ट्रात घुसखोरी करते आहे, त्यामुळे आम्हालाही तोच मार्ग अवलंबावा लागेल, असं मी म्हटले होतो. जर बोम्मईंना चीनचा इतकाच तिटकारा असेल, तर आधी त्यांनी त्यांच्या पंतप्रधानांचा निषेध करावा, मोदींनीच चीनसाठी दरवाजे उघडले आहेत. महाराष्ट्र-कर्नाटक वादात तेल ओतण्याचे काम बोम्मई करत आहेत. अमित शहांबरोबरच्या बैठकीत जे ठरलं होतं, ते मानायला बोम्मई तयारी नाहीत आणि आज ते आमचे संस्कार आणि संस्कृती काढत आहे, आम्हाला त्यांनी संस्कृती आणि संस्कार सांगण्याची गरज नाही”, असं प्रत्युत्तर संजय राऊत यांनी दिले आहे. आज बोम्मईंची जीभ चालते आहे, कारण शिंदे फडणवीस गप्प आहेत, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – “बिल क्लिंटनही विचारतात Who is Eknath Shinde? केवढं काम करतो! कधी झोपतो? कधी…”; CM शिंदेंचा पत्रकारांसमोर दावा

“काल विधानसभेत सर्वच विषयांवर चर्चा झाली आहे. गोंधळ झाला. अनावश्यक विषय चर्चेला आले. खोके सरकारचे आमदार ज्या पद्धतीने काल व्यक्तीगत विषयांवर बोलत होते, त्यांना कर्नाटकने मंजूर केलेल्या ठरावाबाबत माहिती नसावी? हे यांचे महाराष्ट्र प्रेम आहे. ज्यापद्धीने कर्नाटकने त्यांच्या विधानसभेत महाराष्ट्राला एक इचंही जमीन देणार नाही, असा ठराव मांडला. मुळात आम्हाला एक इंचही जमीन नको आहे, आम्हाला आमच्या हक्काचे बेळगाव, कारवार आणि इतर गावं हवी आहेत. हा आमचा कायदेशीर दावा आहे. मात्र, राज्याचे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री या विषयावर तोंड शिवून बसले आहे”, अशी टीकाही त्यांनी केली.

हेही वाचा – “माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्याची तयारी सुरु आहे”, जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप, म्हणाले “हे सरकार गँगस्टरसारखे…”

“महाराष्ट्र कर्नाटक वाद बोम्मईंना त्यांच्या राजकीय फायद्यासाठी निर्माण केला आहे. आम्ही चीनचे एजंट असेल, तर तुम्ही कोणाचे एजंट आहात? जर तुम्हाला बोलायचा घटनात्मक अधिकार आहे, तर आम्हालाही सीमावासियांच्या हक्काबाबत बोलण्याचा घटनात्मक अधिकार आहे. महाराष्ट्रवर तुम्ही हक्क सांगता त्याला विरोध करण्याचा घटनात्मक अधिकार आम्हाला आहे”, असेही ते म्हणाले. कर्नाटक सरकारने ज्याप्रकारे महाराष्ट्राविरोधात निषेध ठराव मंजूर केला, त्याचप्रमाणे महाराष्ट्रानेही कर्नाटकविरोधात विधानसभेत निषेध ठराव मंजूर करावा, अशी मागणीही त्यांनी केली. कर्नाटक सरकार महाराष्ट्रातील नेत्यांवर खटले दाखल करत आहे, माझं राज्य सरकारला आव्हान आहे, त्यांनी बोम्मईंविरोधात महाराष्ट्रात खटला दाखल करून दाखवावा, असेही ते म्हणाले.