साराभाई अवकाश केंद्राचे संशोधन, तापमान नियंत्रणासाठी प्रभावी उपयोग
अवकाश संशोधनाचे आपल्या रोजच्या जीवनात अनेक उपयोग असतात. प्रत्यक्षात आपण ज्या वस्तू वापरत असतो त्यात अवकाश तंत्रज्ञानाचा वापर केलेला असतो, पण आपल्याला ते जाणवतही नाही. विक्रम साराभाई स्पेस सेंटरने तयार केलेले निळ्या रंगाचे उष्णतारोधक म्हणून वापरले जाणारे एरोजेल आता सनिकांसाठी हलक्या वजनाचे जॅकेट व बूट तयार करण्यासाठी वापरले जाणार आहे. या जेलचा वापर वातावरणातील उष्णतेने अग्निबाणाच्या पहिल्या टप्प्यातील इंजिने पेटू नयेत यासाठी सध्या केला जातो.
या संस्थेचे संचालक के.सिवन यांनी सांगितले की, प्राथमिक टप्प्यावरच्या अग्निबाण टप्प्यांमध्ये ज्या मोटारी असतात त्या वातावरणाच्या उष्णतेने जळू नयेत म्हणून सध्या जेलचा वापर केला जातो. या तंत्रज्ञानाचा वापर सनिकांसाठी कमी वजनाचे सुरक्षा जॅकेट तयार करण्यासाठी होऊ शकतो.
हा शोध क्रांतिकारी आहे कारण सियाचेनसारख्या उंच ठिकाणी जे सनिक काम करतात त्यांच्यासाठी जॅकेटचे वजन या जेलमुळे २०० ते ३०० ग्रॅम कमी करता येईल, तर बुटांचे वजन ८० ग्रॅमने कमी करता येईल. सध्या आपल्या लष्कराचे जवान जे जॅकेट व बूट वापरतात त्यांचे वजन ३ किलोपर्यंत आहे.
आतापर्यंत भारतीय अवकाश संशोधन संस्थाही हे उष्णतारोधक मिश्रण दुसऱ्या देशातून खरेदी करीत असे. त्यासाठी परकीय चलनाचा खर्च जास्त होता, त्यामुळे जेल भारतातच तयार केल्याने परकीय चलन वाचणार आहे. स्वदेशी बनावटीचे जेल शीतक म्हणून काम करते व उष्णतारोधकाचे कामही करते.
मेक इन इंडिया कायक्र्रमात या जेलचा समावेश करून त्याचे उत्पादन सुरू करण्यात येत आहे. १९८४ पासून गेल्या नोव्हेंबपर्यंत सियाचेन मध्ये ८६९ भारतीय जवानांचा मृत्यू झाला, त्यात अलीकडेच नाईक हनुमंतप्पा कोप्पड यांचा विचित्र हवामान व हिमकडे कोसळून मृत्यू झाला होता. सध्या तरी या जेलचे सूत्र म्हणजे ते कसे तयार केले जाते याबाबत जाहीर वाच्यता करण्यात आलेली नाही.
जगातील सर्वात हलक्या कृत्रिम पदार्थाचा वापर त्यात केलेला आहे, रोजच्या जीवनातही सामान्य लोकांना वीज बिल कमी करण्यासाठी त्याचा फायदा होणार आहे. जेलचा थर काचेच्या तावदानांना दिला तर खोलीचे तापमान कमी होते, परिणामी आपण खोली थंड करण्यासाठी एसी व पंखे यातून करीत असलेला वीज वापर कमी होतो व वीज वाचते.
ज्या भागात गारठा आहे तिथे  या जेलने नेमका उलटा परिणाम साधला जातो व खोली उबदार राहते. मेक इन इंडिया कडून इनोव्हेट इंडियाकडे वाटचाल करण्यासाठी या जेलचे देशी उत्पादन महत्त्वाचे ठरणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sarabhai space research centre aerogel rocket
First published on: 23-04-2016 at 01:29 IST