मध्य प्रदेशमधील सतना जिल्ह्यामधील एका आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाची सध्या जोरदार चर्चा आहे. येथील एका पाळीव कुत्रीने पाच पिल्लांना जन्म दिला म्हणून कुत्रीच्या मालकाने चक्क १२ गावच्या लोकांसाठी जंगी समारंभ आयोजित केला. या समारंभामध्ये १२ गावच्या लोकांना आमंत्रण देण्यात आलं होतं. समारंभात कुत्रीचं कौतुक करण्याबरोबरच महाभोजनाच्या कार्यक्रमाचंही आयोजन करण्यात आलं होतं. गाणी, डान्ससारख्या गोष्टींच्या माध्यमातून नुकत्याच जन्मलेल्या कुत्र्यांना आशिर्वाद देण्यासाठी पाहुण्यांची गर्दी झाल्याचं पहायला मिळालं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खरं तर असं काही घडलं आहे हे वाचायला जरी थोडं विचित्र वाटतं असलं तरी ही घटना सतना जिल्ह्यातील खोही गावात खरोखर घडलीय. जुली नावाच्या पाळीव कुत्रीने पाच पिल्लांना जन्म दिल्यानंतर मालकाला आनंद गगनात मावेनासा झाला. आपल्या कुत्रीने पाच पिल्लांना जन्म दिल्याच्या आनंदात या मालकाने आजूबाजूच्या गावातील लोकांसाठी जेवणायाचे आयोजन करण्याची इच्छा व्यक्त केली. गावकरी आणि कुटुंबियांनी या व्यक्तीच्या इच्छेचा मान राखत महाभोजनाच्या कार्यक्रमाची तयारी सुरु केली. १२ गावांमधील जवळजवळ दोन हजार जणांना या महाभोजनाच्या कार्यक्रमाचं आमंत्रण देण्यात आलं होतं. लोकांनाही या कार्यक्रमामध्ये येऊन भोजनाचा आनंद घेतला आणि कुत्रीला तसेच तिच्या पिल्लांना भरभरुन आशिर्वाद दिले. या कार्यक्रमानिमित्त जुलीला खास कपडे शिवण्यात आलेले.

या कार्यक्रमामध्ये ढोल वाजवण्यात आले, घोडे नाचवण्यात आले आणि आलेल्यांना नाचता यावं म्हणून ऑर्केस्ट्राचेही आयोजन करण्यात आलं होतं. लोकांनी या कार्यक्रमातील सर्वच गोष्टींचा आनंद घेतल्याचे न्यूज १८ ने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. मुस्तफा खान असं या कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या कुत्रीच्या मालकाचं नाव आहे. मुस्तफा यांना या कार्यक्रमाचं आयोजन करण्यासाठी गावातील उमेश पटेल आणि आर. के. कुरील यांनी मदत केली होती. या कार्यक्रमाच्या पत्रिकाही छापण्यात आल्या होत्या.

एका कथेमुळे कुत्र्यांना विशेष मान

ही बातमी वाचून तुम्हाला आश्चर्य वाटलं असलं तरी या गावामध्ये एक दंतकथा सांगितली जाते. या कथेनुसार या प्रदेशात एकदा अन्न टंचाई निर्माण झाली होती. त्यावेळी अनेकांवर उपासमारीची वेळ आलेली. त्यावेळी या गावातील कुत्र्यांनी भगवान गैबीनाथ यांच्याकडे प्रार्थना केली होती. त्यानंतरच येथील अन्न टंचाई दूर झाली. तेव्हापासून या गावातील लोकं कुत्र्यांना विशेष सन्मान देतात आणि त्यांच्याबद्दल श्रद्धा बाळगतात.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Satna bitch gave birth to 5 puppies owner offer mass feast to 12 villages scsg
First published on: 29-01-2021 at 08:35 IST