‘ज्या ग्रहाभोवती कडे आहे तो ग्रह म्हणजे शनी’, असं आपल्यापैकी सर्वांनाच सूर्यमालेमधील शनी ग्रह कसा ओळखावा हे शिकवताना सांगितले गेले आहे. शनी ग्रहापासून दोन लाख ८० हजार किलोमीटवर असणारी ही कडी शनीला इतर ग्रहांपासून वेगळं ठरवते. मात्र शनीची ओळख असणारी ही कडी लवकरच नष्ट होणार असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

हो हे वृत्त खरे आहे. वैज्ञानिकांनी अंदाज बांधलेल्या त्याहून अधिक वेगाने शनी भोवतालची ही कडी नष्ट होत असल्याचे निदर्शनास आले आहे. सध्या शनी ग्रहाच्या भूपृष्ठभागावर या कड्यांमधून दर सेकंदाला दहा हजार किलो वजनाचा बर्फ, खडक आणि धुलिकण पडत आहेत. हा खडकांचा पाऊस म्हणजे शनीच्या कडी नष्ट होत असल्याचे संकेत आहेत. शनीभोवतालच्या कडी ही खडक, बर्फ आणि धुलिकणांनी बनलेली आहेत. सुर्याची युव्ही किरणे तसेच अंतराळातील इतर खगोलिय गोष्टींचा सतत मारा होत असल्याने या कडांमधील घटकांचे तुकडे होऊन ते शनीच्या भूपृष्ठभागावर पडत आहेत.

शनीच्या कडांमधून होणाऱ्या या खडकांच्या पावसाची माहिती पहिल्यांदा १९८० मध्ये मिळाली. नासाच्या व्हॉयेजर्स मोहिमेअंतर्गत यानाने टिपलेल्या फोटोमध्ये शनीच्या वातावरणामध्ये काळ्या रंगाचे पट्टे अढळून आले त्यावेळी शनीवर अशाप्रकारचा पाऊस पडतो हे पहिल्यांदा मानवाच्या लक्षात आले. त्यावेळी शनीच्या कडांमधून पडणारा खडकांचा पाऊस असाच सुरु राहिल्यास तीन लाख वर्षांमध्ये शनीची कडी पूर्णपणे नष्ट होतील असा अंदाज शास्त्रज्ञांनी व्यक्त केला होता. मात्र मागील वर्षी शनीच्या दिशेने पाठवण्यात आलेल्या कॅसिनी या यानाने पाठवलेल्या फोटोंमधून पावसांचे प्रमाण वाढल्याचे निदर्शनास आले आहे. कॅसिनी या शनीच्या भूपृष्ठभागावर आदळून नष्ट झाले असले तरी त्यांनी पाठवलेल्या फोटोवरून शनीची कडी अपेक्षित वेळेच्या आधीच नष्ट होतील असा अंदाज शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. सध्याचा या कड्यामधून शनीवर पडणाऱ्या खडकांच्या पावसाचे प्रमाण पाहता शनीची कडी केवळ एक हजार वर्षे राहतील असं शास्त्रज्ञांच म्हणणं आहे.

कड्यांशिवाय शनीची ओळख पुसली जाईल असं वाटतं असलं तरी शनी भोवतालची ही कडी शनीच्या निर्मिती पासूनची नसल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. शनीची निर्मिती ४५० कोटी वर्षांपूर्वी झाली आहे. तर त्यांच्या भोवतालच्या कड्यांचे वय अवघे १० ते २० कोटी वर्षे इतकेच आहे. म्हणजेच सोप्प्या भाषेत सांगायचे तर पृथ्वीवर डायनसॉर होते तेव्हा शनीला कडी नव्हती.