Satyajit Ray Ancestral House News : बांगलादेशातील ढाका या ठिकाणी भारतातले महान दिग्दर्शक सत्यजीत रे यांचं वडिलोपार्जित घर आहे. हे घर पाडण्याची तयारी करण्यात येते आहे. दरम्यान केंद्र सरकारने आणि ममता बॅनर्जींच्या सरकारने हे घर पाडू नका अशी विनंती बांगलादेश सरकारला केली आहे.
नेमकं हे प्रकरण काय आहे?
भारतातले महान फिल्ममेकर आणि दिग्दर्शक सत्यजीत रे यांचं वडिलोपार्जित घर बांगलादेशच्या मैमनसिंह भागात आहे. सत्यजीत रे यांचं हे घर त्यांचे आजोबा उपेंद्र किशोर रे यांनी बांधलं होतं ज्याचं पाडकाम सुरु करण्याची तयारी झाली आहे. सध्या हे घर बांगलादेश सरकारच्या अखत्यारित आहे. या घराची अवस्था अगदीच खिळखिळी झाली आहे. तरीही परराष्ट्र मंत्रालयाने आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी हे घर पाडू नये म्हणून बांगलादेश सरकारला विनंती केली आहे. बांगला सांस्कृतिक पुनर्जागरणाचं प्रतीक म्हणून आम्ही या घराकडे पाहतो. त्यामुळे हे घर उद्ध्वस्त करण्यााधी थोडा विचार करा असं केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे. या घराची डागडुजी करुन ते दुरुस्त करुन पुन्हा उभं कसं राहिल या पर्यायांचा विचार करता येईल असंही आवाहन केंद्र सरकारने बांगलादेश सरकारकडे केलं आहे. तुम्हाला यासाठी जी कुठलीही मदत लागेल ती भारत सरकारकडून केली जाईल असंही सांगण्यात आलं आहे. आता बांगलादेश सरकारकडून काय निर्णय घेतला जातो? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
ममता बॅनर्जींनी या घराबाबत काय म्हटलं आहे?
सत्यजीत रे यांच्या बांगलादेशातील घराबाबत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. “केंद्र सरकारने या प्रकरणात लक्ष घालावं आणि ते घर उद्ध्वस्त होणार नाही हे बघावं. सत्यजीत रे यांच्याशी संबंधित असलेल्या घराचं पाडकाम सुरु करण्यात आल्याच्या बातम्या येत आहेत. त्यामुळे हे पाडकाम लवकरात लवकर थांबवलं जावं. बंगालच्या सांस्कृतिक इतिहासाचा हा वारसा काळाच्या पटलावरुन कायमचा पुसला जाईल. मी बांगलादेश सरकारला माझ्याकडून ही विनंती करते आमचा हा सांस्कृतिक वारसा संरक्षित करावा. भारत सरकारने या प्रकरणी तातडीने लक्ष द्यावं.” असं ममता बॅनर्जींनी म्हटलं आहे.
बांगलादेशात नेमकं कुठे आहे हे घर?
बांगलादेश पुरातत्त्व खात्याच्या माहितीनुसार ढाका या शहरापासून १२० किमी अंतरावर सत्यजीत रे यांचं हे वडिलोपार्जित घर आहे. साधारण शंभर वर्षांपूर्वी हे घर उपेंद्र किशोर रे म्हणजेच सत्यजीत रे यांच्या आजोबांनी बांधलं होतं. १९४७ ला जी फाळणी झाली त्यानंतर हे घर बांगलादेशच्या अखत्यारित गेलं. आता या घराचं पाडकाम करु नये अशी विनंती भारताने बांगलादेश सरकारला केली आहे.