Saudi Arabia Bus Accident lone survivor Abdul Shoeb Mohammed : सौदी अरेबियातील मदिना शहराजवळ झालेल्या बस अपघातात ४४ भारतीय यात्रेकरुंचा मृत्यू झाला आहे. हे यात्रेकरू मक्केहून बसने मदिनेला जात होते. मदिनापासून ४० किलोमीटर अलीकडे मुफ्रीहाट स्थानकाजवळ त्यांची बस रस्त्याच्या कडेला उभी असताना एक डिझेलचा टँकर बसला धडकला. या अपघातामुळे भीषण स्फोट होऊन बस व टँकरने पेट घेतला. या अपघातात ४२ यात्रेकरुंसह अन्य दोन स्थानिक नागरिक मृत्युमुखी पडले. तर, एक यात्रेकरू व बसचा चालक या अपघातातून बचावले.

हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, या अपघातात २४ वर्षीय मोहम्मद अब्दुल शोएब बचावले आहेत. बस रस्त्याकडेला उभी होती तेव्हा बसमधील सर्व प्रवासी झोपले होते. शोएबही झोपण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, त्यांना झोप लागत नव्हती म्हणून ते वेळ घालवण्यासाठी चालकाच्या शेजारी जाऊन बसले आणि गप्पा मारू लागले. त्याचवेळी डिझेलचा टँकर बसला धडकला. क्षणार्धात शोएब व बसच्या चालकाने बसमधून बाहेर उडी मारली.

बसमधील प्रवासी जागे होऊन बाहेर पडण्याआधीच मोठा स्फोट होऊन बसने पेट घेतला होता. त्यामुळे कोणालाही बसमधून बाहेर पडता आलं नाही. अपघातात चालक गंभीर जखमी झाला आहे. तर शोएब यांना किरकोळ दुखापत झाली आहे. भारतीय वेळेनुसार रविवारी मध्यरात्री १.३० वाजता हा अपघात झाला. त्यानंतर शोएब यांना रुग्णालयात नेण्यात आलं. शोएब यांनी सकाळी ५.३० वाजता त्यांचे नातेवाईक तहसीन यांना फोन केला आणि ते सुखरूप असल्याचं सांगितलं. बसमधून उडी मारल्यामुळे त्यांना किरकोळ दुखापत झाली होती. त्यांच्यावर मदिनामधील जर्मन रुग्णालयात उपचार करण्यात आले.

(बातमी अपडेट होत आहे.)