सौदी अरेबियात गेल्या १० दिवसांत अंमली पदार्थांशी संबंधित गुन्ह्याखाली १२ जणांना फाशीची शिक्षा देण्यात आली आहे. यामध्ये काहीजणांचा तलवारीने शिरच्छेद करण्यात आल्याची माहिती आहे. 'टेलिग्राफ'ने दिलेल्या वृत्तानुसार, अंमली पदार्थांचा वापर केल्याप्रकरणी कारावासाची शिक्षा झालेल्या एकूण १२ जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. यामध्ये तीन पाकिस्तानी, चार सीरियन, दोन जॉर्डियन आणि तीन सौदी नागरिक होते. यावर्षी मार्च महिन्यात सौदी अरेबियाने तब्बल ८१ लोकांना फाशी दिली होती. सौदी अरेबियाच्या आधुनिक इतिहासातील ही सर्वात मोठी कारवाई होती. हे लोक हत्या, दहशतवादी गटाशी संबंध तसंत वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये सहभागी होते. सौदी अरेबियाने अशा प्रकारच्या शिक्षा कमी करण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र दोन वर्षांनी पुन्हा एकदा सौदी अरेबियाने टोकाची शिक्षा दिली आहे. क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्या यांनी २०१८ मध्ये तुर्कीमध्ये अमेरिकन पत्रकार जमाल खशोग्गी यांची हत्या झाल्यानंतर त्यांनी हे आश्वासन दिलं होतं. सौदी प्रशासनाने केवळ खून किंवा हत्याकांडात दोषी आढळलेल्यांनाच फाशीची शिक्षा दिली जाईल सांगत शिक्षा कमी करण्याचा प्रयत्न केला होता.