सौदी अरेबिया प्रशासनाने घेतलेल्या नव्या निर्णयामुळे भारतीयांच्या अडचणी वाढणार आहेत. सौदी अरेबियाने एक जुलैपासून परदेशातून आलेल्या लोकांवर ‘अवलंबित्व कर’ आकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सौदी अरेबियात कुटुंबासोबत वास्तव्यास असलेल्या परदेशी लोकांवर कर लावण्यात येणार आहे. या नव्या नियमामुळे कुटुंबासोबत सौदी अरेबियात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला १०० रियाल (जवळपास १७०० रुपये) कर स्वरुपात द्यावे लागणार आहेत. सौदी अरेबियात असलेल्या भारतीयांची संख्या तब्बल ४१ लाख इतकी आहे. सौदी अरेबियातील परदेशी नागरिकांमध्ये भारतीयांचे प्रमाण सर्वाधिक आहे.

सौदी अरेबिया ‘अवलंबित्व कर’ आकारणार असल्याने अनेक भारतीयांनी त्यांच्या कुटुंबीयांना भारतात माघारी पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. ‘अवलंबित्व कराचा बोजा उचलण्याची क्षमता नसल्याने कुटुंबाला हैदराबादला पाठवणार आहे,’ असे मोहम्मद ताहिर या भारतीयाने टाईम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वर्तमानपत्रासोबत बोलताना सांगितले. सौदी अरेबियात राहणारे अनेक भारतीय आपल्या कुटुंबाला भारतात पाठवणार असल्याचेदेखील मोहम्मद ताहिरने म्हटले. मोहम्मद ताहिर संगणक अभियंता आहे. ‘परदेशातून सौदी अरेबियात आलेल्या लोकांनी लग्न न करताच राहावे, असे प्रशासनाला वाटते,’ अशी मार्मिक प्रतिक्रिया एका भारतीयाने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर दिली.

सौदी अरेबिया सरकार पाच हजार रियालपेक्षा (जवळपास ८६ हजार रुपये) अधिक वेतन असलेल्या परदेशी कामगारांना फॅमिली विसा देते. पाच हजार रियाल वेतन असलेली व्यक्ती पत्नी आणि दोन मुलांसोबत सौदीत वास्तव्यास असल्यास त्या व्यक्तीला अवलंबित्व करापोटी दर महिन्याला ३०० रियाल (जवळपास ५ हजार रुपये) करापोटी सरकारला द्यावे लागणार आहेत. सौदी सरकार २०२० पर्यंत या करामध्ये वाढ करणार आहे. त्यामुळे सौदीतील लाखो भारतीयांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे.

सौदी अरेबिया सरकारच्या आदेशानुसार परदेशातून स्थायिक झालेल्या सर्व कुटुंबांना ‘अवलंबित्व कर’ आधीच भरावा लागणार आहे. त्यामुळे सौदीतील भारतीयांना बिकट परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. या प्रकरणी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने सौदी अरेबिया सरकारशी कोणताही संवाद साधलेला नाही. या सोबतच या प्रकरणी परराष्ट्र मंत्रालयाकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.