करोनाचा फैलाव रोखण्यासाठी सौदी अरेबियाकडून महत्वाची पावलं उचलली जात असून काही देशांना रेड लिस्टमध्ये टाकलं आहे. या देशांमध्ये प्रवेश करणाऱ्या नागरिकांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा सौदी अरेबियाने दिला आहे. या देशांमध्ये प्रवास करणाऱ्या नागरिकांवर तीन वर्षांसाठी प्रवासाची बंदी घालण्यात येणार असल्याचं वृत्त रॉयटर्सने दिलं आहे.

परराष्ट मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार, काही सौदी नागरिक ज्यांना मे महिन्यात प्रशासनाने कोणत्याही परवानगीशिवाय परदेशात प्रवास करण्याची परवानगी दिली होती त्यांनी प्रवासी नियमांचं उल्लंघन केलं आहे. मार्च २०२० नंतर पहिल्यांदाच ही परवानगी देण्यात आली होती.

“जर कोणी नियमांचं उल्लंघन केलं असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल तसंच मोठा दंड ठोठावला जाईल. याशिवाय त्यांच्यावर तीन वर्षांसाठी प्रवासबंदी घालण्यात येईल,” असं अधिकाऱ्याने सांगितलं आहे. सौदी अरेबियाने ज्या देशांमध्ये प्रवास करण्यास बंदी घातली आहे त्यामध्ये भारताचाही समावेश आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सौदी अरेबियाने अफगाणिस्तान, अर्जेंटिना, ब्राझील, इजिप्त. इथोपिया, भारत. इंडोनेशिया, लेबॅनन, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, तुर्की, व्हिएतनाम आणि संयुक्त अरब अमिराती या देशांमध्ये प्रवास करु नये असा आदेश आपल्या नागरिकांना दिला आहे. “नागरिकांना ज्या देशांनी अद्याप करोनावर नियंत्रण मिळवलेलं नाही किंवा क्या देशांमध्ये नवे विषाणू फैलावत आहेत तिथे थेट किंवा दुसऱ्या देशांमधून प्रवास करण्यावर बंदी घालण्यात आली आहे”.

तीन कोटी लोकसंख्या असणाऱ्या सौदी अरेबियात मंगळवारी १३७९ नव्या रुग्णांची नोंद झाली. यासोबत देशातील करोना रुग्णसंख्या ५ लाख २० हजारांवर पोहोचली असून ८१८९ जणांचे मृत्यू झाले आहेत.