शस्त्रास्त्र कायद्याखाली सुनावण्यात आलेल्या शिक्षेविरोधात अभिनेता संजय दत्तने केलेली फेरविचार याचिका मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. याचिका फेटाळल्यामुळे संजय दत्तला न्यायालयाकडून दिलासा मिळण्याची शेवटची शक्यताही आता मावळली. संजय दत्त सध्या पुण्यातील येरवडा तुरुंगात शिक्षा भोगत आहे.
मुंबईतील १९९३च्या साखळी बॉम्बस्फोटात शस्त्रास्त्र कायद्याखाली संजय दत्तला पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पैकी दीड वर्षांची शिक्षा त्याने अगोदर भोगली असल्यामुळे त्याला साडेतीन वर्षांची शिक्षा भोगावी लागणार आहे. ही शिक्षा भोगण्यासाठी संजय दत्तने १६ मे रोजी मुंबईतील सत्र न्यायालयात आत्मसमर्पण केले. सुरुवातीला काही दिवस आर्थर रोड तुरुंगात ठेवल्यानंतर २२ मे रोजी त्याला तेथून पुण्यातील येरवडा कारागृहात हलविण्यात आले.
दरम्यान, शिक्षेतून माफी मिळवण्यासाठी संजय दत्त राज्यपाल किंवा राष्ट्रपतींकडे अर्ज करू शकतो.