न्यायालयाचा अवमान केल्याच्या आरोपावरून माजी लष्करप्रमुख जनरल व्ही. के. सिंग यांना सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी नोटीस बजावली. सिंग यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत न्यायालयाबद्दल व्यक्त केलेले विधान आक्षेपार्ह असल्याचा आरोप ठेवत त्यांच्याविरुद्ध न्यायालयाने स्वतःहून याचिका दाखल करून घेतली.
सिंग यांना २३ ऑक्टोबरपूर्वी नोटिशीला उत्तर देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बलात्काराच्या खटल्यातील पीडितेचे वय निश्चित करण्यासाठी दहावीचे प्रमाणपत्र पुरावा म्हणून गृहित धरले जाते, तर मग आपल्या जन्मतारखेवरून निर्माण झालेल्या वादावेळी त्याचा विचार का केला गेला नाही, असा प्रश्न सिंग यांनी एका वृत्तापत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते. त्यानंतर न्यायालयाने त्यांच्याविरोधात अवमान याचिका दाखल करून घेतली. न्या. आर. एम. लोढा आणि न्या. एच. एल. गोखले यांच्या पीठाने सिंग यांना नोटीस बजावली आहे.