कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना दिलासा देताना सर्वोच्च न्यायालयाने भिवंडीतील न्यायालयात त्यांच्या विरोधात सुरू असलेल्या खटल्याच्या सुनावणीला स्थगिती दिली. त्याचबरोबर या खटल्यामध्ये राहुल गांधी यांना उपस्थित राहण्याची कोणतीही गरज नसल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले. न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांच्या खंडपीठाने गुरुवारी हा आदेश दिला.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी राहुल गांधी यांना मुंबई उच्च न्यायालयाने भिवंडी न्यायालयाच्या पुढील सुनावणीला हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार त्याला उद्या, शुक्रवारी भिवंडीतील न्यायालयात हजर व्हायचे होते. मात्र, राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून या खटल्याच्या सुनावणीला स्थगिती देण्याची मागणी केली. त्यावरील सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने भिवंडी न्यायालयातील खटल्याच्या सुनावणीला स्थगिती दिली.
लोकसभा निवडणुकीवेळी भिवंडीतील प्रचारसभेदरम्यान, राहुल यांनी महात्मा गांधींच्या हत्येला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जबाबदार असल्याचे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेत संघाने भिवंडी न्यायालयात राहुल गांधीविरुद्ध मानहानीचा दावा दाखल केला होता. संघाकडून सादर करण्यात आलेल्या साक्षी-पुराव्यांच्या तपासणीनंतर भिवंडी न्यायालयाने राहुल गांधींना हजर राहण्याचे आदेश दिले होते. राहुल गांधी यांनी या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान दिले. मात्र, उच्च न्यायालयानेही त्यांना याप्रकरणी दिलासा देण्यास नकार दिला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sc stays proceedings against rahul gandhi in defamation case
First published on: 07-05-2015 at 03:06 IST