जवाहरलाल नेहरू विद्यापीठात संसद हल्ला प्रकरणात फाशी दिलेला गुन्हेगार अफजल गुरूच्या समर्थनार्थ कार्यक्रमात देशविरोधी घोषणाबाजीच्या प्रकरणात आरोपी असलेला तेथील विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैयाकुमार याचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाकडे पाठवला आहे.
याप्रकरणी थेट सर्वोच्च न्यायालयात जामीन अर्ज करण्यात आला होता पण त्यावर न्यायालयाने असे सांगितले की, याबाबत उच्च न्यायालयाने सुनावणी करावी कारण आम्ही जर या अर्जावर सुनावणी केली तर चुकीचा पायंडा पडण्याची शक्यता आहे. मग सर्वच आरोपी थेट सर्वोच्च न्यायालयात जामीन अर्ज करतील. राजकीय व्यक्तींशी संवेदनशील प्रकरणे असतील किंवा महत्त्वाच्या व्यक्तींबाबतची प्रकरणे असतील तेव्हा न्यायालयातील वातावरण काय असते ते आपणा सर्वाना माहिती आहे, त्यामुळे ही याचिका आम्ही सुनावणीसाठी दिल्ली उच्च न्यायालयाकडे पाठवत आहोत. आम्ही सुनावणी केली तर तो हस्तक्षेप ठरेल व त्यातून चुकीचा पायंडाही पडेल. मात्र उच्च न्यायालयाने याबाबत तातडीने सुनावणी करावी असे आदेश आम्ही देत आहोत.
सुनावणीच्या वेळी सर्व पक्षकारांना संधी दिली जाईल व न्यायालयाच्या कक्षात मोजक्याच लोकांना प्रवेश दिला जाईल. किती जणांना प्रवेश द्यायचा ही जबाबदारी रजिस्ट्रार जनरल यांची राहील.
कुठल्याही प्रकरणात लोक थेट सर्वोच्च न्यायालयात जामीन अर्ज करू लागले तर योग्य नाही असे न्या. जे.चेलमेश्वर व ए.एम. सप्रे यांनी सांगितले. हे अशा प्रकारचे एक प्रकरण नाही त्यामुळे अपवाद करता येणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले.