भारताचा शेजारी देश नेपाळमधील राजकीय स्थिती कमालीची तणावपूर्ण झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून नेपाळमधील Gen Z आणि मोठ्या संख्येने तरुणाई रस्त्यांवर उतरून नेपाळ सरकारविरोधात आंदोलन करताना दिसत आहे. आधी सोशल मीडिया साईट्सवर बंदी घातल्याचा निषेध या तरुणाईनं केला. त्यावर १९ तासांनी ही बंदी सरकारला उठवावी लागली. मात्र, त्यानंतरदेखील रस्त्यावर उतरलेल्या तरुणाईचा असंतोष कमी झाला नाही. देशातील वाढत्या भ्रष्टाचाराचा निषेध करण्यासाठी तीव्र आंदोलन करण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान नेपाळच्या रस्त्यावर संघर्ष पाहण्यास मिळतो आहे. आंदोलकांनी सर्वोच्च न्यायालयही पेटवलं आहे. दरम्यान इथल्या इन्फ्लुएनर्सनी काही धक्कादायक दावे केले आहेत.

काय म्हटलं आहे सोशल मीडिया इन्फ्लुएनसर्सनी?

“शाळकरी मुलांवर गोळ्या झाडण्यात आल्या. अगदी लहान मुलांवरही गोळीबार झाला.” मिस नेपाळ अर्थ २०२२ सारिशा श्रेष्ठाने तिच्या टिकटॉक व्हिडीओत हा दावा केला आहे. तिने असंही म्हटलं आहे की काही अधिकारी रुग्णालयात आले. तिथे उपचार सुरु असलेल्या रुग्णांवरही त्यांनी गोळीबार केला. सुरुवातीला शांततेत सुरु असलेल्या आंदोलनाला या घटनांमुळे हिंसक वळण लागलं असा दावा तिने केला आहे. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.

Nepal Protest News
नेपाळमध्ये आंदोलन

रुथ खडका या इन्फ्लुएन्सरने काय म्हटलं आहे?

रुथ खडका नावाचा इन्फ्लुएन्सरने हा दावा केला आहे की शाळेतल्या मुलांवर गोळीबार करण्यात आला. आंदोलन शांततेत चाललं होतं. पण शाळेचा गणवेश घातलेल्या अल्पवयीन मुलांवर गोळीबार केला गेला. एवढंच नाही तर मुलींवर आणि महिलांवर बलात्कार करण्यात आला. ज्या मुली आणि महिला देशातल्या भ्रष्टाचाराविरोधात बोलत होत्या त्यांचा आवाज दाबण्यासाठी आणि दहशत निर्माण करण्यासाठी इतक्या नीच पातळीला जाऊन कृत्यं करण्यात आली. पोलिसांचं काम कायद्याचं रक्षण करणं असतं. त्याचा दुरुपयोग करणं नाही असंही त्याने म्हटलं आहे.

दृष्टी अधिकारी या टिकटॉकराच गंभीर आरोप

दृष्टी अधिकारी या टिकटॉकरने म्हटलं आहे की आमच्या आंदोलनाचं उत्तर सरकारने आम्हाला रबर बुलेट, अश्रू धुराच्या नळकांड्या आणि गोळीबार याने दिलं. ज्यांचा या आंदोलना दरम्यान मृत्यू झाला त्यातला एक मुलगा शाळकरी गणवेशात होता. शांततेत सुरु असलेल्या आंदोलनाला सरकारनेच हिंसक वळण दिलं. महिलांच्या घरात घुसून त्यांच्यावर बलात्कार करण्यात आला.

पंतप्रधानांचं शासकीय निवासस्थान पेटवलं!

दरम्यान, नेपाळमध्ये संतप्त झालेल्या आंदोलकांनी आज पंतप्रधानांच्या शासकीय निवासस्थानाला आग लावून ते पेटवून दिलं. पंतप्रधानांबरोबरच सत्ताधारी गटातील इतरही काही महत्त्वाच्या नेत्यांच्या घरांना अशाच प्रकारे आग लावण्यात आली. सोमवारी आंदोलक व पोलीस प्रशासन यांच्यात झालेल्या धुमश्चक्रीमध्ये १९ आंदोलकांचा मृत्यू झाला. त्याचे तीव्र पडसाद आंदोलकांमध्ये उमटले. परिणामी मंगळवारी सकाळपासूनच कर्फ्यू असूनही आंदोलक आक्रमकपणे निदर्शने करत सरकारी मालमत्तांवर हल्ले करताना दिसून आले.

आंदोलनामागचं खरं कारण आणि तात्कालिक कारण

गेल्या काही दिवसांपासून नेपाळमध्ये सरकारी यंत्रणांमधील भ्रष्टाचाराविरोधात वातावरण तापू लागलं होतं. विरोधकांनीदेखील सरकारच्या भ्रष्टाचारावर तीव्र शब्दांत टीका केली होती. त्याअनुषंगाने नेपाळी जनतेमधूनही या प्रकारांना विरोध केला जाऊ लागला. त्यातच सोमवारी नेपाळ सरकारने फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप, यूट्यूब, एक्स अशा सोशल मीडिया साईट्सवर बंदी घालण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे संतप्त झालेले तरुण रस्त्यावर उतरले. त्यात Gen Z वयोगटातील नवतरुणांचा मोठ्या प्रमाणावर समावेश होता. पहिल्यांदाच नेपाळमधील Gen Z अशा प्रकारे उत्स्फूर्तपणे एखाद्या आंदोलनात सहभागी झाले होते.