नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील वाढत्या प्रदूषणामुळे राज्य सरकारने बंद केलेल्या शाळा, महाविद्यालये सोमवार, २९ नोव्हेंबरपासून पुन्हा सुरू करण्यात येतील अशा घोषणा दिल्ली सरकारचे पर्यावरणमंत्री गोपाल राय यांनी बुधवारी केली. दिल्ली सरकारने आज घेतलेल्या निर्णयाची माहिती दिली.

सोमवारपासून सर्व सरकारी कार्यालयेही सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले. आतापर्यंत सरकारी कर्मचारी घरून काम करत होते. राय यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना सार्वजनिक वाहतूक सेवा वापरण्याचे आवाहन केले. त्यांच्यासाठी विशेष बस सोडण्यात येतील. तसेच २७ नोव्हेंबरपासून अत्यावश्यक सेवांसाठी असणाऱ्या सर्व सीएनजी, इलेक्ट्रिक वाहनांना दिल्लीत प्रवेश दिला जाईल, असे राय यांनी सांगितले.  इतर इंधनावर चालणाऱ्या वाहनांच्या प्रवेशावरील बंदी ३ डिसेंबपर्यंत कायम राहील, असे  राय यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या आढावा बैठकीनंतर सांगितले. हवेच्या गुणवत्तेत सुधारणा आणि कामगारांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन दिल्ली सरकारने सोमवारी बांधकाम करण्यावरील आणि पाडकामावरील बंदी उठवली.

दिल्लीतील वाढत्या प्रदूषणामुळे राज्य सरकारने शाळा, महाविद्यालयांसह सर्व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचा निर्णय १३ नोव्हेंबर रोजी घेतला होता.