नवी दिल्ली : दिल्लीतील हवेच्या प्रदूषणाची सध्याची परिस्थिती लक्षात घेता येथील शाळा प्रत्यक्ष उपस्थितीसाठी पुढील आदेशापर्यंत बंद राहतील; तर ऑनलाइन वर्ग आणि बोर्डाच्या परीक्षा सुरू राहतील, असे शिक्षण संचालनालयाने रविवारी जाहीर केले.

हवेचा दर्जा रविवारी सकाळी ‘अतिशय वाईट’ होता, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. सकाळी ९ वाजता हवेच्या दर्जाचा निर्देशांक (एअर क्वालिटी इंडेक्स- एक्यूआय) ३८२ इतका होता. शनिवारी २४ तासांतील सरासरी एक्यूआय ३७३ इतका होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (एनसीआर) आणि आसपासच्या भागांच्या हवा गुणवत्ता व्यवस्थापन आयोगाच्या पुढील आदेशांपर्यंत सर्व शाळा तत्काळ प्रभावाने बंद करण्याचे निर्देश पर्यावरण खात्याने दिले आहेत. त्यामुळे सर्व सरकारी व खासगी शाळा पुढील आदेशांपर्यंत बंद राहतील’, असे शिक्षण विभागाच्या अतिरिक्त संचालक रिता शर्मा यांनी सांगितले. तथापि, ऑनलाइन अध्यापन वर्ग आणि बोर्डाच्या परीक्षा यापूर्वी जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार घेतल्या जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. दिल्लीतील हवेच्या ढासळत्या गुणवत्तेच्या पार्श्वभूमीवर शाळा व इतर शैक्षणिक संस्था बंद करण्याची घोषणा दिल्ली सरकारने १३ नोव्हेंबरला केली होती. करोना महासाथीमुळे सुमारे १९ महिने बंद राहिल्यानंतर येथील शाळा १ नोव्हेंबरपासून उघडल्या होत्या.