जगातील कलाकार व वैज्ञानिक एकत्र येऊन जानेवारीत गोवा महोत्सव साजरा करणार आहेत. विशेष म्हणजे पुढील वर्ष हे आंतरराष्ट्रीय प्रकाश व प्रकाश तंत्रज्ञान वर्ष असल्याने तेथे प्रकाशाची सर्व गूढे उकलली जाणार आहेत. प्रकाशामुळे पक्षी गातात, वनस्पती वाढतात, साप सळसळत सरपटू शकतात.
पणजी महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने १४ ते १८ जानेवारी दरम्यान ‘प्रकाशकथा महोत्सव’ आयोजित करण्यात येत असून त्यात १४ देशांचे ४५ कलाकार सहभागी होत आहेत. प्रकाशाच्या अनेक उपयोगांची माहिती यातून सामान्य लोकांना मिळेल, शहराच्या रस्त्यांवरही या महोत्सवात असे कार्यक्रम होतील, ज्यात प्रकाशाची रहस्ये उलगडली जाणार आहेत. मांडवी नदीच्या किनाऱ्यावर दोन किलोमीटरच्या पट्टय़ात हा महोत्सव होणार असून त्यात छायाचित्रण कार्यशाळा, प्रकाशरंग अशा अनेक बाबींचा समावेश आहे. ब्रिटनचे जॅडेन हास्टिंग्ज व मेलनी किंग यांनी सूर्यापासून ऊर्जा मिळवण्याच्या माणसाच्या प्रयत्नांवर आधारित असा सायनोटाइप मिरमार बंदरावर तयार करण्याचे ठरवले आहे. सायनोटाइप ही छायाचित्र छपाईची कला असून त्यात लाल-निळ्या प्रतिमा येतात. मुंबईचे कलाकार अर्जुन राठी हे भौमितिक आकारांच्या मदतीने मानवी शरीरातील चक्रांचे महत्त्व प्रकाशाच्या दृष्टिकोनातून सांगतील.
प्रकाश महोत्सव १४ ते १८ जानेवारीदरम्यान मांडवी नदीच्या किनारी
४५ कलाकार सहभागी
सायनोटाइप छायाचित्र तंत्राचा उपयोग
वैज्ञानिक, कलाकार, तत्त्वज्ञ, शिक्षणतज्ञ यांचा सहभाग
२०१५ आंतरराष्ट्रीय प्रकाश वर्ष साजरे केले जाणार