ला पामा,कॅनरी आयलंड: स्पेनमधील बेटांवरील ज्वालामुखीच्या उद्रेकात पाचशे इमारती गाडल्या गेल्या असून सुमारे सहा हजार लोक विस्थापित झाले आहेत. आता गेल्या आठवडय़ापासून या ज्वालामुखीतून राख व लाव्हारस बाहेर पडण्याचे प्रमाण कमी झाले आहे. वैज्ञानिकांच्या मते सध्यातरी उद्रेकाची प्रक्रिया संपली असे म्हणणे धाडसाचे ठरणार आहे. कॅनरी आयलंड टेलिव्हिजनन जी दृश्ये दाखवली त्यानुसार ला पामा बेटावर कुंब्रे विजा पर्वतराजीत आता राखेचे लोट दिसत नाहीत. १९ सप्टेंबरला या ज्वालामुखीचा उद्रेक झाला होता. ला पामा ज्वालामुखी हा कमी सक्रियतेच्या टप्प्यात असून माद्रिद येथील इन्स्टिटय़ूट ऑफ जिओसायन्सेस या संस्थेने ट्विटमध्ये म्हटले आहे की, ज्वालामुखीची तीव्रता कमी झाली आहे. आगामी काळात त्याची वाटचाल कशी होते हे पहावे लागेल. स्पेनमधील ला पामा बेटावरील लोकांनी विषारी वायू टाळण्यासाठी घरातच थांबावे असे आवाहन करण्यात आले आहे. अजूनही लाव्हा रस एक हजार अंश तापमानापर्यंत जाऊ शकतो व त्याचे वहन होऊ शकते. अॅटलांटिक महासागरात हा लाव्हारस वीस अंश सेल्सियस तापमानाने मिसळत आहे. वैज्ञानिकांनी म्हटले आहे की, औष्णिक धक्क्य़ाने पाण्याची वाफ होत असून हायड्रोक्लोरिक आम्ल तयार होत आहे. ज्वालामुखीपासून काचेसारखे कण तयार होत असून त्यामुळे श्वसनमार्गात अडथळे येतात.
संग्रहित लेख, दिनांक 28th Sep 2021 रोजी प्रकाशित
स्पेनमधील ज्वालामुखीच्या उद्रेकात घट
१९ सप्टेंबरला या ज्वालामुखीचा उद्रेक झाला होता.
Written by वृत्तसंस्था

First published on: 28-09-2021 at 04:37 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Scientists spanish volcano has entered low activity phase zws