शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) परिषदेतील एका कार्यक्रमात पाकिस्ताननं गोंधळ घालून स्वतःचेच हसे करून घेतले आहे. या कार्यक्रमात प्रदर्शनाच्या माध्यमातून भारत आणि पाकिस्तानने संघटनेच्या इतर सदस्य राष्ट्रांसमोर आपला ऐतिहासिक वारसा सांगितला. दोन्हीही देशांनी मोगल सम्राट शहाजहानचा उल्लेख केला. शहाजहानची जगप्रसिद्ध स्थापत्य कला आपल्या ऐतिहासिक वारशातील भाग आहे, असं सांगण्याचा प्रयत्न केला आणि ते सांगताना पाकिस्ताननं मोठी चूक केली. पाकिस्तानी प्रतिनिधी मंडळानं प्रदर्शनादरम्यान दिल्लीतील लाल किल्ल्याचे छायाचित्र दाखवलं. त्यात लाल किल्ल्यावर भारताचा तिरंगा फडकला होता. पण पाकिस्ताननं लाल किल्ल्याचे हे छायाचित्र लाहोरमधील शालिमार गार्डनजवळील एका किल्ल्याचे असल्याचं सांगितलं. या हास्यास्पद कृतीमुळं पाकिस्तान तोंडावर आपटला.
पाकिस्ताननं केवळ दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ला आपला आहे, असं सांगितलं नाही, तर मोगलांचा ऐतिहासिक वारसाही आपलाच आहे, असा दावा केला. पाकिस्ताननं या प्रदर्शनावेळी लाल किल्ल्यातील संगमरवराचे महाल आणि सजावटीचाही उल्लेख केला. तर भारतानं प्रदर्शनादरम्यान लाल किल्ला आणि ताज महालला स्थान दिलं. ताज महालबाबत सविस्तर माहिती देताना भारतानं लाल महाल हा प्रसिद्ध मकबरा असल्याचं सांगितलं. मोगल सम्राट शहाजहाननं बेगम मुमताज हिच्या स्मरणार्थ हा महाल बांधला. महालाचे बांधकाम १६३१ मध्ये सुरु झालं आणि १६४८ मध्ये ते बांधून पूर्ण झालं. जगातील सात आश्चर्यांपैकी ताजमहाल हा एक आहे, असं भारताकडून सांगण्यात आलं. पण पाकिस्ताननं लाल किल्ला आणि मोगल सम्राट शहाजहानची स्थापत्य कलेचा वारसा आपला असल्याचा दावा केल्यानं शांघाय सहकार्य संघटनेच्या इतर सदस्य राष्ट्रांसमोर पाकिस्तान तोंडघशी पडले, हे मात्र नक्की.