नवी दिल्ली : शांघाय सहकार्य संघटनेचा (शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनचा – एससीओ) मूळ हेतू दहशतवादाला अर्थपुरवठा थांबवण्याचा आहे, ते काम या संघटनेने प्रामाणिकपणे पार पाडावे, असे मत भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर व्यक्त केले आहे. संघटनेच्या एका बैठकीत पाकिस्तान व चीनचे समपदस्थ उपस्थित असताना त्यांनी ही सूचना केली आहे.

‘दुशान्बे’ या ताजिकीस्तानच्या राजधानीत झालेल्या परिषदेत त्यांनी अफगाणिस्तानातील स्थिती, सार्वजनिक आरोग्य व आर्थिक उत्थान यावर भर दिला. रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावारोव, चीनचे परराष्ट्र मंत्री वँग यी, पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी उपस्थित होते. जयशंकर यांनी ट्वीट संदेशात म्हटले आहे, की दुशान्बे येथे झालेल्या परिषदतेच आपण सार्वजनिक आरोग्य व इतर विषयांवर भाष्य केले. तसेच ‘एक जग एक आरोग्य’ या मुद्दय़ावर भर दिला. करोना रोखण्यासाठी जागतिक लसीकरणाचा मुद्दा मांडला. एका स्वतंत्र कार्यक्रमात जयशंकर यांनी शांघाय सहकार्य मंडळाच्या विसाव्या वर्धापनदिनी आयोजित बैठकीत सांगितले, की या संघटनेने खऱ्या आव्हानांचा मुकाबला केला पाहिजे. त्यात अफगाणिस्तान व कोविड नंतर परिस्थिती पूर्ववत करणे हे मुद्दे महत्त्वाचे आहेत.

अफगाणिस्तानात अलीकडे अनेक दहशतवादी हल्ले झाले आहेत. अमेरिकेने जवळपास सर्व सैन्य माघारी घेतले आहे. ऑगस्टअखेर ती प्रक्रिया पूर्ण होणार आहे. अमेरिकेचे सैन्य दोन दशके तेथे होते. अफगाणिस्तानातील स्थिती नाजूक आहे.

एससीओ ही संघटना नाटोला पर्याय म्हणून काम करू शकते, त्यात आर्थिक व सुरक्षा मुद्दय़ावर मदत करू शकते. भारत व पाकिस्तान हे एससीओ  सदस्य २०१७ मध्ये झाले होते. एससीओची स्थापना २००१ मध्ये शांघाय येथे रशिया, चीन, किरगीझ प्रजासत्ताक, कझाकिस्तान, ताजिकिस्तान व उझबेकिस्तान यांच्या अध्यक्षांनी केली होती. २००५ मध्ये भारत या संघटनेचा निरीक्षक बनला होता.