Crime News : मागच्या वीस वर्षांत केरळमधून चार महिला गायब झाल्या आहेत. या महिलांचा शोध सुरु असतानाच या प्रकरणाने नवं वळण घेतलं. कारण पोलिसांना सबॅस्टिअन नावाच्या ६८ वर्षीय माणसाच्या घरातून पोलिसांना काही मानवी हाडं आणि कवटी सापडली आहे. जी हाडं सापडली आहेत ती एका महिलेची असून या हाडांमध्ये मांडीच्या हाडांचा समावेश आहे. तसंच कवटीच्या एका दातात डेंटल क्लिप आढळून आली. ज्यानंतर गायब झालेली एक महिला कोण? याचा सुगावा लागला आहे. या प्रकरणी पोलिसांनी सबेस्टियनला अटक केली आहे.
सबेस्टियनच्या जी हाडं सापडली ती महिला कोण?
सबेस्टियनच्या घरी पोलिसांना जी हाडं आणि कवटी सापडली त्यातल्या दाताला असलेल्या क्लिपवरुन महिलेची ओळख पटली आहे. ही क्लिप वनराड येथे पंचायत समितीत काम करणाऱी कर्मचारी आयशाची आहे असं पोलिसांनी सांगितलं. आयशा काही वर्षांपूर्वी गायब झाली होती. वीस वर्षांत ज्या चार महिला गायब झाल्या त्या सगळ्या प्रकरणांत सबेस्टियन हा समान धागा आहे. त्यामुळे सबेस्टियन हा सीरियल किलर असावा असा पोलिसांना संशय आहे. दरम्यान अद्याप त्याने गुन्हा कबूल केलेला नाही. दरम्यान सेबस्टियनवर बिंदू पद्मनाभन (वय ४७), सिंधु (वय ४३) आणि जयनम्मा (वय ५५) या तीन महिलांची हत्या केल्याचाही आरोप आहे. मागील २० वर्षांत या चार महिला गायब झाल्या होत्या त्यांचा कुठलाही सुगावा लागलेला नाही. सबेस्टियनने लाय डिटेक्टर टेस्ट करण्यासही नकार दिला आहे.
जयनम्मा उर्फ जैन कशी गायब झाली?
मागील वर्षी २३ डिसेंबरला जयनम्मा तिच्या घरातून गायब झाली. या प्रकरणाचा तपास सुरु करण्यात आला पण जयनम्मा सापडली नाही. या प्रकरणात दोन आठवड्यांपूर्वी पोलिसांना एक धागा आढळून आला. कारण जयनम्माच्या कुटुंबातील एका सदस्याला तिच्या मोबाइलवरुन एक फोन आला. पोलिसांनी त्या नंबरचं लोकेशन तातडीने तपासलं. कोटायम या ठिकाणी हे ठिकाण आढळलं शिवाय हे ठिकाण दुसरं तिसरं नसून सबेस्टियनचं घरच होतं. तोपर्यंत संशयाची सुई त्याच्या सबेस्टियनच्या दिशेने फिरलेली नव्हती. मात्र या दोघांचे कॉल आणि मोबाइल लोकेशन तपासले गेले तेव्हा सबेस्टियन आणि जयनम्मा यांचे मोबाइल एकाच भागात कार्यरत होते ही महत्त्वाची माहिती पोलिसांना मिळाली.
३० जुलैला सबेस्टियनला पोलिसांनी केली अटक
गुंतागुंतीच्या या प्रकरणात पोलिसांनी सबेस्टियनला ३० जुलै रोजी अटक केली. त्याच्या घराच्या परिसरात महिलेची हाडं पुरल्याचा महत्त्वाचा पुरावा पोलिसांच्या हाती लागल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. कोटायम पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं की जयनम्माच्या हत्येच्या प्रकरणात आम्ही सबेस्टियनला अटक केली आहे त्याने गुन्हा कबूल केला आहे. सबेस्टियन जयनम्माला अनेक वर्षांपासून ओळख होता. सबेस्टियनच्या सासरचे लोक कोटायमच्या एटुमानुर भागात वास्तव्य करतात. दरम्यान आम्हाला जी हाडं सापडली आहेत त्याची डीएनए चाचणी करण्यात येत आहे. त्यानंतरच त्या हाडांची ओळख पटू शकेल असंही पोलिसांनी सांगितलं. सबेस्टियनने जयनम्माचे दागिने गहाण ठेवून कर्ज घेतलं होतं असंही पोलिसांनी सांगितलं.
गायब झालेल्या तीन महिला कोण?
बिंदू पद्मनाभन २००६ मध्ये गायब झाली, त्यानंतर आयशा ही महिला २०१२ मध्ये गायब झाली. तर सिंधु नावाची महिला २०२० मध्ये गायब झाली. या तिघींचीही हत्या करुन त्यांचे मृतदेह सबेस्टियननेच पुरले असावेत असा संशय पोलिसांना आहे. बिंदू नावाची महिला ही माजी महसूल अधिकाऱ्याची मुलगी होती. ती २००६ पासून गायब आहे. तिच्या कुटुंबाने तिच्या बेपत्ता होण्याची तक्रार २०१७ मध्ये दाखल केली होती. २००६ पासून बिंदू बेपत्ता होती पण ती कुटुंबापासून वेगळं राहात होती. २०१७ पासून तिचा काहीही संपर्क झालेला नाही यासाठी ही तक्रार दाखल करण्यात आली होती. दरम्यान सबेस्टियनला अटक केल्यानंतर पोलिसांना त्याच्या घरी जमिनीची बनावट कागदपपत्रंही मिळाली. एका महिलेचं शाळेचं प्रमाणपत्रही आढळून आलं. आता या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत.
आयशा आणि सिंधु या दोन महिलाही बेपत्ता
आयशा ही महिला २०१२ पासून गायब आहे. ती सबेस्टियनच्या संपर्कात आली होती अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. या महिलेला तिच्या जमिनीचा व्यवहार करायचा होता. त्या व्यवहारात सबेस्टियन मध्यस्थ होता त्यावेळी त्याची ओळख आयशाशी झाली होती. तर सिंधु नावाची महिला २०२० मध्ये गायब झाली होती. दोन दिवसांनी तिच्या मुलीचा साखरपुडा होणार होता. त्याआधीच ती गायब झाली. या तिन्ही घटनांमागे सबेस्टियनचा हात आहे असा संशय पोलिसांना आहे त्या अनुषंगाने हा तपास करण्यात येतो आहे. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे.