मोहालीतील पोलीस गुप्तचर कार्यालयावर रॉकेट प्रोपेल्ड ग्रेनेड हल्ल्याने सुरक्षा यंत्रणांची झोप उडाली आहे. दोनच दिवसांपूर्वी सुरक्षा यंत्रणांनी मोठ्या प्रमाणात स्फोटकं पकडल्यानंतरही अलर्ट जारी केला होता. सतर्क असूनही पोलिसांच्या इंटेलिजन्स विंगच्या कार्यालयावर हल्ला झाल्याने खळबळ उडाली आहे. मोहालीत झालेल्या स्फोटानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. राज्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. राजधानी चंदिगडमध्येही सतर्कता आहे. हल्ल्यानंतर सेक्टर-७७ परिसर सील करण्यात आला आहे. मोहालीच्या एंट्री एक्झिट पॉइंटवर नाकाबंदी करण्यात आली आहे. तपासासाठी आयबी, एनआयए, रॉ आणि एसपीजीचे विशेष पथक मोहालीत पोहोचले आहे. मुख्यालयाजवळ बांधलेल्या ४ इमारतींमध्ये रात्रभर शोधमोहीम सुरू होती. या हल्ल्यात गुप्तचर विभागाच्या सीसीटीव्हीचेही नुकसान झाले आहे.

मोहाली बॉम्बस्फोट प्रकरणातील प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, हल्लेखोराने यापूर्वी इंटेलिजन्स ऑफिसची रेकी केली होती. पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार जिथे गेली होती त्या सोहाना रोडपासून इंटेलिजन्स ऑफिसकडे जाणारा रस्ता तपासण्यासाठी पोलिसांनी त्याच रस्त्यावर असलेल्या पंजाब फर्निचर हाऊसचे सीसीटीव्ही फुटेजही घेतले आहेत. या रस्त्यावर एकच दुकान असून येथे सीसीटीव्हीही बसविण्यात आले आहे. पंजाब पोलीस संध्याकाळी ६ ते ८ या वेळेत परिसरात सक्रिय असलेल्या मोबाईल नेटवर्कची देखील चौकशी करत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

दुसरीकडे, भगवंत मान सरकारवर विरोधकांच्या हल्ल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, मोहाली स्फोट हे पंजाबची शांतता बिघडवू इच्छिणाऱ्यांचे भ्याड कृत्य आहे. आम आदमी पक्षाचे पंजाब सरकार त्या लोकांचं उद्दीष्ट्य पूर्ण होऊ देणार नाही. पंजाबमधील सर्व जनतेच्या सहकार्याने सर्व परिस्थितीत शांतता राखली जाईल आणि दोषींना कठोर शिक्षा केली जाईल.