कोलंबो : श्रीलंकेच्या वायव्येकडील हिंसाचारग्रस्त रामबुक्काना भागात सरकारने गुरुवारी खबरदारीचा उपाय म्हणून सैन्य तैनात केले. यापूर्वी अधिकाऱ्यांनी गुरुवारी स्थानिक वेळेनुसार सकाळी ५ वाजता संचारबंदी हटवली होती.

ताज्या इंधन दरवाढीविरुद्ध निदर्शने करणाऱ्या नि:शस्त्र आंदोलकांवर पोलिसांनी येथे केलेल्या गोळीबारात एक जण ठार, तर १३ जण जखमी झाले होते. केगाले रुग्णालयात दाखल असलेल्या जखमींपैकी किमान तिघांची प्रकृती गंभीर असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. १५ पोलीसही या हिंसाचारात जखमी झाले होते.

 गोळीबारात जखमी झालेल्या चािमडा लक्ष्मण या ४१ वर्षांच्या व्यक्तीच्या पश्चात दोन मुले आहेत. ‘मला माझ्या वडिलांच्या मृत्यूबाबत न्याय हवा आहे, पैसा किंवा इतर कुठलीही मदत नको,’ असे त्याची १६ वर्षांची मुलगी पियुमी लक्षणी ही म्हणाली.

दरम्यान, या व्यक्तीच्या  पार्थिवावर अंत्यसंस्काराच्या पार्श्वभूमीवर सैन्याला पाचारण करण्यात आल्याचे सरकारने सांगितले. शनिवापर्यंत ते तेथे तैनात राहणार आहे. संचारबंदी हटवण्यात आल्यानंतर सुरक्षा पुरवण्यासाठी सैनिकांना पाचारण करणारी २१ एप्रिल ही तारीख असलेली अधिसूचना जारी करण्यात आली.

 ‘याप्रकरणी निष्पक्ष चौकशी करण्याची विनंती आम्ही मानवाधिकार आयोगाला केली आहे. आम्ही प्रामाणिक असून आम्हाला काहीही लपवायचे नाही’, असे परराष्ट्रमंत्री जी.एल. पेरिस यांनी पत्रकारांना सांगितले.